Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता निकाल काहीही लागो, 'या' दोन आमदारांना धोका नाही!
Shiv Sena MLA Disqualification : दुसरीकडे या राजकीय तणावात दोन आमदारांना मात्र, कोणताही धोका नाही. आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके या दोन आमदारांवर अपात्रता निकालाचा परिणाम होणार नाही. दोन्ही आमदार ठाकरे गटातील आहेत.
Shiv Sena MLA Disqualification : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA Disqualification)आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल जाहीर करतील. शिवसेना शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे या राजकीय तणावात दोन आमदारांना मात्र, कोणताही धोका नाही. आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके या दोन आमदारांवर अपात्रता निकालाचा परिणाम होणार नाही. दोन्ही आमदार ठाकरे गटातील आहेत.
जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. शिवसेनेतील बंडाची धग वाढल्यानंतर शिंदे गटाने पक्षावर दावा सांगत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्यानंतर दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी व्हीप बजावला. या व्हीपचे पालन न केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांच्याविरोधात कारवाई का नाही?
शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्यानंतर शिंदे गटाने या कारवाईतून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचे जाहीर केले होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करणार नसल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. तर, ठाकरे गटातील इतर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली.
आमदार ऋतुजा लटके या देखील आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूर असणार आहेत. त्यांचे पती आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्याच दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे शिंदे गटाला बहाल करत असल्याचा निर्णय दिला. शिवसेना ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले. मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. ठाकरे गटाच्या नव्या चिन्हावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आमदार ठरल्या.
>> अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार
शिवसेना शिंदे गट 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
6) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटिल
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील