Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी घोषणा करुनही आमदारकीचा राजीनामा का दिला नाही?
Uddhav thackeray : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.
Uddhav thackeray : विधानसभेतील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत सत्ता गमवावी लागली. त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा न दिल्याने विधान परिषदेत शिवसेनेच संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासाठी शिवसेना दावा करताना पाहायला मिळते. मात्र विधान परिषदेत शिंदे गट तयार करण्याची हालचाल मोठया प्रमाणावर सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात जून 2022 मध्ये झालेली विधान परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या सर्वांच्या लक्षात राहील अशी आहे. कारण याच निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय मोठा भूकंप झाला. आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकीकडेविधान परिषदेच्या निवडणुकीचा कल हाती येत होता. तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुरतेला दाखल होत होते. शिवसेनेतील आमदारांनी शिंदे गट तयार केला आणि अखेर मुख्यमंत्रीपदाचा उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. हाच राजीनामा देत असताना आपण आपल्या आमदारकीचा ही राजीनामा देण्याची उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती....
उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने हा राजीनामा सभापती यांच्याकडे द्यावा लागतो. मात्र सभापती म्हणून रामराजे निंबाळकर यांचा कालावधी संपल्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे द्यावा लागला असता. विधान परिषदेमधील पक्षीय संख्याबळ पाहता लगेच राजीनामा देऊ नये, असं उद्धव ठाकरे यांना पक्षातून आणि इतर सल्लागारांकडून सांगण्यात आलं.
विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे प्रत्येकी 10 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 12 आमदार आहेत. त्यातील नीलम गोऱ्हे या पीठासन अधिकारी असल्याने त्यांचं मत ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची संख्या समान होईल. आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते म्हणून दावा करतील आणि म्हणून याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा अद्याप दिलेला नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा न दिल्याने शिवसेनेकडे एकमताने संख्या जास्त आहे. येत्या अधिवेशनात शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा दावा करणार आहे. या दाव्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे फारस आव्हान नसलं तरी शिंदे गटाकडून मात्र नव्याने आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विधानसभेतील आमदारांनी बंडखोरी करून शिंदे गट स्थापन केल्यानंतर विधान परिषदेतील आमदार आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा जोरदार सुरू आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात शिंदे गटाचा विधान परिषदेमध्ये गट तयार होतो की विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेला यश मिळतं, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे.