शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर बंदोबस्त, केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा
Maharashtra Politics Shivsena MP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
मुंबई : आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या या निर्णयानंतर त्यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिंदे गटात सहभागी होण्याच्या खासदारांच्या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या 12 खासदारांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिकच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासून मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला असून गोडसे यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या रूईकर कॉलनीतील घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागपुरातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घराबाहेर आणि कार्यालयासमोर देखील पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर आणि बँकेसमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे, बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, खासदार भावना गवळी, खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे आता खासदारांच्या निर्णयानंतर देखील शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
शिवसेनेच्या या 12 बंडखोर खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटात सामिल झालेल्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. शिंदे गटाने दिलेल्या पत्रात लोकसभा सचिवालयाने बदल सुचवले आहेत. त्यामुळे आता हे पत्र आज संध्याकाळी किंवा उद्या लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
या सर्व खासदारांनी गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती.त्यानंतर खासदारांचा हा गट उघडपणे शिंदे गटाचे समर्थन करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या