Dasara Melava : ठाकरेंच्या कोडींसाठी शिंदेंचा प्लॅन 'बी', दसरा मेळाव्यासाठी मुंबईतली प्रमुख मैदानं बुक करण्याची तयारी
ठाकरे आणि शिंदे या दोघांचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दावा असल्यानं याबाबत निर्णय लागणं थोडं कठिणच दिसतंय म्हणून शिंदे गटानं दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानासोबत इतर मैदानं बुक करायचा विचार सुरु आहे.
मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून जोरदार राजकारण सुरु आहे. यंदा दसरा मेळावा कोणाचा आणि कुठे होणार याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे विरुध्द शिंदे भाजप आणि मनसे एक वातावरण तयार झाले आहे. त्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याला दादरचं छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे आणि शिंदे गटानं परवानगी मागितली आहे जर हे मैदान मिळालं नाहीतर बीकेसी, सौमय्या, नेस्को आणि इतर छोट्या मैदानाची चाचपणी सुरु आहे.
ठाकरे आणि शिंदे या दोघांचा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दावा असल्यानं याबाबत निर्णय लागणं थोडं कठिणच दिसतंय म्हणून शिंदे गटानं दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानासोबत इतर मैदानं बुक करायचा विचार सुरु आहे. यामुळे होईल असं की जेव्हा उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाची परवानगी नाकारली जाईल त्यावेळी उद्धव ठाकरेंसाठी मैदानाच शिल्लक राहणार नाही. मुंबईतली विविध मैदानं विविध कार्यक्रमांसाठी भाजप किंवा शिंदे समर्थक अगोदरच बुक केली जाऊ शकतात त्यामुळे पर्यायानं उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार की नाही आणि झाला तर बंदिस्त हॅालमध्ये हा मेळावा होणार का? यावर प्रश्नचिन्ह आहे.
शिवसेना आणि शिंदे गटामध्ये दसरा मेळाव्याच्या आयोजनावरुन रस्सीखेच सुरु आहे.गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि सर्वच काही चित्र बदलून गेलंय. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही त्यात पक्षाच्या कार्यक्रमात देखील विभागण्या होताना दिसत आहे हे सगळं सुरु असाताना स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही.