बारामतीत सुप्रिया सुळे, साताऱ्यात श्रीनिवास पाटील, अजित पवारांचे उमेदवार शरद पवारांच्याच उमेदवारांशी भिडणार
बारामतीमध्ये बहीण सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजित पवार आपल्या कुटुंबातील कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) आपला पक्ष बारामती , शिरूर , सातारा आणि रायगड मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल असं म्हटलंय. पक्षाच्या कर्जतमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसीय शिबिरात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केली आहे. या चारपैकी तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष असेल ते बारामतीमध्ये बहीण सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजित पवार आपल्या कुटुंबातील कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात याकडे. अजित पवारांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात याआधी कधीही न झालेला पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय .
आपल्या पक्षाच्या कर्जतमधील शिबिराचा समारोप करताना अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय आणि थोरल्या पवारांना थेट आव्हान दिलंय. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार जिथून निवडणून आलेत त्या बारामती , सातारा , शिरूर आणि रायगड या लोकसभेच्या चार जागा आपला पक्ष लढवेल असं अजित पवारांनी जाहीर केले आहे . त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या राज्यातील इतर जागांवरही आपण दावा सांगू असं अजित पवारांनी म्हटले आहे.
पवार विरुद्ध पवार रंगणार सामना
अजित पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळणार आहेत तर रायगडमध्ये अजित पवार गटात असलेल्या सुनील तटकरेंविरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो.
बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency)
सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार स्वतःच्या पत्नी सुनेत्रा पवारांना किंवा मुलगा पार्थाला उमेदवारी देतात की कुटुंबातील कटुता टाळण्यासाठी बाहेरचा उमेदवार देतात याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाचा विचार बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून होऊ शकतो .
सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha Constituency)
बारामतीप्रमाणेच सातारा हा देखील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय . पण आता पक्षात फूट पडल्यानंतर खासदार श्रीनावस पाटील यांच्याविरद्ध अजित पवार गटाकडून नितीन लक्ष्मण पाटील यांना उमेदवारी देऊ शकतात. नियतीनं पाटील हे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू असून माजी खासदार लक्ष्मण पाटील यांचे चिरंजिव आहेत . मात्र या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची भूमिका महत्वाची राहील . कारण अजित पवारांसोबत उदयनराजेंचं कधीच जमलेलं नाही .
शिरूर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency)
शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे या शरद पवार गटासोबत गेलेल्या विद्यमान खासदारांच्या विरूद्ध अजित पवार उमेदवार म्हणून शिंदे गटात गेलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करू शकतात. आढळराव पाटील हे चार वेळा शिवसेनेकडून खासदार राहिलेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्यास आढळराव त्यांच्या पाठीमागे कशामार्फत उभे राहू शकतात. दुसरा तुल्यबळ उमेदवार या मतदारसंघात सध्यातरी अजित पवारांकडे नाही .
रायगड (Raigad Lok Sabha Constituency)
रायगड मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे निवडणूक लढवू शकतात. तटकरे अजित पवारांसोबत गेल्याने जागा वाटपात हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतो .
अजित पवारांचे आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले
भाजप फारसा प्रभावी नाही किंवा पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत तिथे राष्टवादीचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या विरुद्ध लढवण्याचा हा प्लॅन आहे . अर्थात यामध्ये सर्वाचं लक्ष असेल ते बारामतीमध्ये खरंच पवार विरुद्ध पवार सामना होणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेला सुप्रिया सुळेंनी तेवढ्याच आक्रमकपणे उत्तर दिलंय. आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी आपण निवडणुकीला तयार आहोत असं त्यांनी म्हटलंय . त्याचबरोबर अजित पवारांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावलेत .
पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात जशी राष्ट्रवादी विभागली गेलीय तशीच ती बारामतीत देखील विभागली गेली आहे. पण बारामतीच्या मतदारांनी गेली पंचावन्न - साठ वर्ष फक्त पवार कुटुंबातील उमेदवाराला निवडणून दिलंय . मात्र यावेळी पवार कुटुंबातील दोनपैकी एका उमेदवाराची निवड बारामतीच्या मतदारांना करायला लागू शकते. अजित पवारांनी ही घोषणा करायच्या आधीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची तयारी सुरु करण्यात आलीय .
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करणं महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणालाही सोपं नसणार आहे . कारण आपल्या मित्रपक्षच्या ताब्यात असलेल्या जागेवर अनेकजण दावा करणार आहेत . पण अजित पवारांच्या दृष्टीनं सर्वात कठीण निर्णय असेल तो बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध उमेदवाराची निवड करण्याचा . कारण राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळे हे पवार कुटुंबाकडून अनेकदा सांगितलं गेलं असलं तरी निवडणुकीतील संघर्ष थेट कुटुंबाच्या आतमध्ये होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे .
बहुसंख्य आमदार आणि पक्षसंघटना शिवसेनेत फूट पडल्यानंतर जशी एकनाथ शिंदेंसोबत गेली तशीच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ती अजित पवारांसोबत आली. पण लोकप्रतिनिधी आले म्हणून राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार अजित पवारांसोबत गेलाय का हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे . पण त्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आजपर्यंत कधीही न रंगलेला पवार विरुद्ध पवार हा सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे .