शेतकऱ्यांवर दीर्घकाळ परिणाम करणारं अस्मानी संकट, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार
Sharad Pawar Visit In Marathwada : शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
औरंगाबाद : राज्यात अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याच्या मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आत्ता त्या संकटाला राज्य सरकारची एकट्याची ताकत आहे, असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
LIVE UPDATE बांधावर नेते | शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वपक्षीय नेते दौऱ्यावर
पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्या या भागात येणार आहेत आणि त्यांच्याशी जाऊन बोलेन. त्यांची मनापासून इच्छा आहे की लोकांना काहीही करून मदत केली पाहिजे. मदत करायची त्यांची तयारी आहे. तरी एक मर्यादा आहे, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागेल. याबाबत येत्या दहा दिवसात पंतप्रधानांना भेटू महाराष्ट्राला मदत केली पाहिजे. हा आग्रह धरू, असं ते म्हणाले.
स्वत: पंतप्रधान मदत करू असे म्हणत आहेत. या संकटाचं स्वरूप पाहिल्यानंतर आम्हाला मदत करावी लागेल ही त्यांची भावना आहे, असंही पवार म्हणाले.
पवार, फडणवीसांसह काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर, 'मुख्यमंत्र्यांना घर सुटेना!' भाजपचा आरोप
नेत्यांचे दौरे सुरु राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही भागांचा दौरा केला आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील.