(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खडकवासला विधानसभाच्या उमेदवारीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रावादीत चढाओढ, विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण यांचा थेट इशारा
Maharashtra Election 2024: खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जवळपास 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे.
Khadakwasla Vidhan Sabha : राज्यातील सर्वात हायव्होल्टेज लढाई असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाकडून जवळपास 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. यातच शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज एका माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून मी या मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. 2009, 2011, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. तरी देखील मी जोमाने पक्षाचे काम केले.
मात्र, त्यावेळी आम्हाला यश मिळू शकले नाही. पक्षातील जेष्ठ कार्यकर्ता म्हणून मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र पक्षाने विचार नाही केला तर येत्या विधानसभा निवडणुकीनंतर नक्की वेगळा विचार करावा लागेल. असा इशाराही काका चव्हाण यांनी यावेळी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माझी भावना समजून पक्ष नेतृत्वाने योग्य विचार करावा, आशी मी पक्षाकडे विनंती करतो. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
खडकवासला मतदारसंघात कोण बाजी मारणार?
खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शहरी, ग्रामीण आणि निमशहरी आशा तीन भागात विभागलेला आहे. खडकवासला मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर या मतदारसंघाचा 70 टक्के भाग हा शहरी असून 30 टक्के भाग हा ग्रामीण आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलीय. याआधी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली. आता परत त्यांनी मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.विविध भागात जाऊन त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. तर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपूत्र मयुरेश वांजळे हे देखील निवडणूकीची अपक्ष तयारी करताना दिसत आहेत. त्यामुळे गुंतागुंतीच्या खडकवासला मतदारसंघात 2024 ला कोण बाजी मारणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा