राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी;निकाल लागेपर्यंत अजित पवारांना नवं चिन्हं देण्याची मागणी
Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर आज न्यायालय काही वेगळे निर्देश देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष (Nationalist Congress Party)आणि घड्याळ चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार (NCP Ajit Pawar) यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या न्याय पिठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यात शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रकरण मेंशन करतेवेळी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्वाची मागणी करण्यात आली होती. यातील प्रमुख मागणी म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आज कोर्ट काही वेगळे निर्देश देतं का हे पाहणं महत्वाचं आहे.
शरद पवार यांच्या पक्षाने कोर्टाकडे केलेल्या मागण्या नेमक्या काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मुख्य मागणी यात करण्यात आली आहे. सोबतच अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा, असेही त्यात म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना (अजित पवार) यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं, अशी मागणी करण्यात आली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याने आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने "हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे" अशा आशयाच्या जाहिराती वृत्तपत्रात देण्याचे निर्देश अजित पवार यांना दिले होते. दरम्यान आजच्या सुनावणीत न्यायालय नेमकं काय निर्णय देणार, याकडे राजकीय पक्षासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
हे ही वाचा