Majha Katta : शिवसेनेत बंडाची ठिणकी कधी पडली? बंडखोर आमदार शहाजीबापूंनी स्पष्टच सांगितले
Shahajibapu Patil, Majha Katta : शिवसेनेतील बंडाची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असताना झाली होती. कुणालाही हे आवडले नव्हते.. तिथे कुठलेही स्वातंत्र नव्हते.
Shahajibapu Patil, Majha Katta : शिवसेनेतील बंडाची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असताना झाली होती. कुणालाही हे आवडले नव्हते.. तिथे कुठलेही स्वातंत्र नव्हते. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर घराकडे जाईपर्यंत फोन आला. त्यानंतर इकडून तिकडे नेहण्यात आले. कोण काही बोलत नव्हते... उद्धव ठाकरे संध्याकाळी येणार.. त्यानंतर आमदारांपुढे त्यांचं भाषण व्हायचे. पाचसहा मिनिटांत ते पुन्हा जायचे. हे नेमकं काय घडतेय... याबद्दल आम्ही तडपडायचो. ज्यांच्याविरोधात लढलो, तीच माणसे आता आपल्यासोबत सत्तेत..आता आपली कामं कशी होणार? अशी सगळीच काळजी होती. माझ्यामते शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 50 आमदारांना हे आवडले नव्हते, असे शहाजीबापू यांनी माझा कट्टयावर स्पष्टच सांगितले.
आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलो होते. आता जर त्यांचे मंत्री झाले तर रागात आपली कामे करणार नाहीत. आपलं वाटोळं करुन टाकणार, असे मला वाटले. अशीच भिती इतरांनाही होती, असे शहाजीबापू म्हणाले.
निधीचं समान वाटप झालं नाही - शहाजी बापू
157 कोटी रुपयांचा निधीचा आकडा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी जाहीर केला. पण मी आतापर्यंत 300 कोटी रुपयांपर्यंत निधी नेहलाय. पण मंत्री असून या दोघांनाही माहित नाही. मला मिळालेल्या निधीचा प्रश्न नाही.. पण आतापर्यंत बारामतीचा निधी 1500 कोटी रुपयांचा झालाय. साडेसातशे कोटी रुपयांचा निधी झालाय रोहित पवारांचा... जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा निधी किती आहे? मग ही तफावत कशासाठी.. निधीचं समान वाटप का नाही झाले? सर्वांना निधी मिळाला पाहिजे... विरोधकांनाही निधी मिळालाय हवा. निधीचं समान वाटप व्हायला हवं. भाजपला निधी कमी दिला जात होता. इतकेच नाही तर सत्तेत असूनही शिवसेनाला निधी पुरेसा दिला जात नव्हता.. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहजासहजी निधी मिळत होता. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली.
बंडखोरी केल्यानंतर आर्थिक लाभ झालाय का?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझा कट्ट्यावर बंडखोर आमदारांना वैयक्तिक मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला होता. या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना शहाजीबापू यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, हा एक राजकारणाचा भाग आहे. आम्ही गेल्यानंतर माघारी येणार नाही, हे समजल्यानंतर आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. सुडाचं राजकारण सुरु झालं. यांना पैसे मिळाले, घबाड मिळाले, असे आरोप करण्यात आले. 1974 पासून आतापर्यंत राजकारणात इतक्या खालच्या दर्जाची भाषा कधीच आली नव्हती. संजय राऊत यांनी भाषेची मर्यादा ओलांडली. अलिबागच्या भाषणात त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. एका बाजूला तुम्ही परत बोलवता अन् दुसऱ्या बाजूला प्रेत येतील म्हणून धमक्या दिल्या जातात. असे असताना निर्णय काय घ्यायचा?
बंडखोरीची ठिणगी कुठे पडली?
सूरतला मी आणि शंभूराजे पहिल्यांदा पोहचलो होतो. तुम्ही बंडखोरी करणाऱ्या कोणत्याही आमदारांना विचारा... पण बंडखोरीची ठिणगी नेमकी कुठे सुरु झाली? शिवसेनच्या वर्धापन दिन होता.. हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. आम्ही सर्व आमदार बसलो होतो.. स्टेजवर मान्यवरांच्या खुर्च्या होत्या. संजय राऊतांचे भाषण सुरु होते. तेवढ्यात उद्धव ठाकरे आले. त्यांनी सर्वांना नमस्कार वैगरे केला. त्यावेळी ते दोन मिनिटांसाठी बाहेर जाणार होते.. ते बाहेर जात होते. तेव्हा संजय राऊतांचे भाषण सुरु होते. ते त्यांच्याकडे पाहून म्हणाले की, बाजीप्रभूंना सोडून गेल्यासारखं तुम्ही आम्हला सोडून चाललात का? हे वाक्य मला खटकलं. याचा गर्भीत अर्थ कसाय पाहा तुम्हीच... म्हणजे बाजीप्रभूंना सोडून शिवराय गेले.. येथे तुम्ही शिवाजी महाराजांचा अवमान करताय.. ज्याने बलिदान दिलेय त्या महापराक्रमी बाजीप्रभू यांचाही अवमान तुम्ही करताय.... त्यानंतर उद्धव ठाकरे जाऊन माघारी आले.. त्यांचं भाषण सुरु झालं. ते रागाने बोलायला लागले.. एवढा चांगला दिवस असताना ते रागाने बोलायला लागले. मला माहितेय... कोण बाजारात दूध विकतेय.. जे गद्दार आहेत. त्यांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही. बाहेर आल्यानंतर आम्ही विचारतच पडलो..
या कार्यक्रमात शिंदे साहेबांना लांब बसवले होते. आदित्य ठाकरेंना जवळ बसवले होते. एकनाथ शिंदे गटनेते आहेत. ते आमचे नेते.. नेमानं उद्धव ठाकरे यांच्याशेजारी शिंदे यांना बसवायला हवं होतं. पण त्यांना सर्वात कोपऱ्यात बसवले होते. बाहेर आल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांना सरळ म्हटले.. साहेब घडतेय का पाहा? नाहीतर पक्ष सोडयाला बरा... आम्हाला खूप वाटा आहेत. आम्हाला हे नवे नाही... अनं खरे तेथूनच सुरुवात झाली. सर्व आमदार शिंदेसाहेबांना विचारत होते. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. हे बरोबर नाही... पुढचं काही खरे नाही. अन् शिवसेनेतील बंडखोरीला तेथूनच सुरुवात झाली.
बंडखोरी केल्यानंतर काय घडतेय हे माहित होत का?
हो... शंभर टक्के माहित होतं.
बंडखोरीचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं, असं आमचं म्हणने होते. मग हो नाही.. हो म्हणत त्यांनी अखेर निर्णय घेतला. ज्यावेळी आपण युद्धाला जातो, तेव्हा घरी काय होतेय हे पाहतो का? ही लोकशाही लढाई आहे. आपण पडलो तरी घराकडे जाते अन् जिंकलो तरीही घराकडेच जातो. आम्ही जिंकायचं म्हणूनच गेलो होते. अन् आम्ही जिंकलो.
एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणाचे मॅराडोना
मला सभागृहातच बोलायचं होतं. पण संधी मिळाली नाही. आता इथं सांगतो. फूटबॉलपटू मॅराडोना यांनी ज्यावेळी फूटबॉल खेळायचं सोडलं तेव्हा जागतिक स्पर्धा झाली होती. त्यामधील मॅराडोना याने केलेला गोल, आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. त्याने कसा गोल केला हे कुणालाच नाही समजले. मॅराडोना गेला कसा, आला कसा अन् वळला कसा अन् गोल केला कसा... हे कुणालाच नाही कळलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील मॅराडोना आहेत, असा गोल मारला कुणालाच समजला नाही. आमदार असून मलाही नाही कळला.
बंडानंतर राज्यात काही ठिकाणी पुतळे जाळले, त्यामुळे चिंतेत होतात?
हे ग्रामीण भागात कुठेही झाले नाही... मुंबईमध्ये झाले फक्त. सुर्वे यांच्या इथे झाल्यानंतर आम्ही गोळा झालो होतो. त्यावेळी ते जाऊ दया म्हणाले. इथून गेलो की दोन तासांत सगळे रान भरुन काढतो. हे माझेच चेले आहेत. पाया पडत येतील, असे शहाजीबापू म्हणाले. काही जणांची दु:ख वेगळी होती. यामिनी जाधव यांना कॅन्सर आहे. त्या म्हणाल्या की, मला कॅन्सर आहे. मला कुणाचा फोन नाही. कोण भेटायला नाही. जिव्हाळाच नाही, तर यांच्यापाशी का राहू?
काय डोंगार, काय झाडी, काय हॉटील... एकदम ओक्केच... डायलॉग फेमस कसा झाला?
डायलॉगमागे काही राजकारण नव्हते.. तो कसा व्हायरल झाला हे माहित नाही. पण त्या डायलॉगमुळेच आज मी इथे आहे. सगळे आमदार फोन करत होते, त्यामुळे मलाही फोन करु वाटला. बायकोला फोन केला. पण फोन बंद होता. मग मी रफिक नावाच्या कार्यकर्त्याला फोन केला. त्याच्यासोबत बोलताना ओघानं हा डायलॉग निघाला. माझी रुम प्रशस्त होती. डोंगर-झाडी दिसत होती. त्याच्यासोबत बोलताना ओघानं हा डायलॉग निघाला. ठरवून काही केले नाही.
आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकाऱ्यांकडे लक्ष द्या, शाहजीबापूंचा मुख्यमंत्र्यांना विनंती
दहा तारखेला आषाढी एकादशी आहे. पांढूरंगाला दंडवट घालून मागणी आहे, हे लवकरात लवकर मिटू दे... उद्धव ठाकरे यांनी शिंदेसाहेबांशी बोलून हे प्रकरण मिटवावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, हे प्रकरण चालू राहिले तर आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा वारकऱ्यांकडे लक्ष द्यावे.
सत्य हे शेवटी सत्य असते. त्याला कुणी झाकू शकत नाही. अन् सत्य शिंदे साहेबांच्या बाजूने जाणार. याला कारणेही आहेत. एकनाथ शिंदे संयमी आणि शांत आहेत. त्यात त्यांना पाच वर्षाचा अनुभव असणारे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याचा पुढील अडीच वर्षाचा कारभार नक्कीच चांगला राहणार आहे.
निवडणूक हरल्यानंतर घरी जातो तेव्हा काय?
1990 पासून सात निवडणूका झाल्या. सर्व अटीतटीच्या झाल्या. सहा मिहिने आम्ही दोघेही तयारी करत होतो. प्रत्येक गावात दिवसरात्र काम केले. पण या सातवर्षात आमच्या तालुक्यात एकही केस झाली नाही. हा माझा आणि आबासाहेबांमधील (गणपतरावजी देशमुख ) सुसंवाद होता. निवडणूक हरल्यानंतर मी त्यांचे आशिर्वाद घ्यायचो. अभिनंदन करायचो. ते माझ्या पाटीवरुन थाप टाकायचे, अन् म्हणायचे थांबायचं नाही, पुढे चालायचे..निराश होऊ नका. मला जाताना काही वाटयचं नाही.. पण गाव जवळ आल्यावर मला भिती वाटायची. कारण, घरी गेल्यावर बायकोचं रडण, ओरडं-आरडे अन् राडा वैगरे या गोष्टी मनात यायच्या. याला कसं सामोरं जायचं... याची भिती वाटायची. 'याला उभं राहायला कुणी सांगितलं. सारखं उभा राहतेय, सारखं पडतेय.. आमचा आपमान करतेय... असे बायको म्हणायची..' मग तिची कशीतरी समजूत काढायची. अन् वेळ मारुन न्यायचो, असे शाहजीबापू म्हणाले.
शहाजीबापू राजकारणाकडे कसे वळले?
राजकीय जिवनाचा प्रवास बालपणात झाला. तिसरीमध्ये असताना तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील स्वारीवर भाषण केले. मला लिहून दिलेलं.. मी न वाचता... मला जे माहित आहे, जे मी वाचलेय... त्यानुसार मी भाषण केले. त्यावर टाळ्याचा कडकडाट झाला. या भाषणानंतर गुरुजींनी मला वक्ता होऊ शकतो, असे सांगितलं. त्यानंतर वाचन सुरु झालं. सातवीमध्ये असताना महात्मा गांधी यांच्यावर भाषण केले. याला सोलापूर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळाला. तेथून काँग्रेसबद्दलची आपुलकी वाढत गेली. कराडला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयात शिकायला गेतो. तेथून काँग्रेसचे संस्कार माझ्यावर पडले. त्यानंतर भाऊसाहेब पालकर यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी काँग्रेसचा माहोल होता..त्यातून काँग्रेससाठी काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आलो. त्यानंतर मी काही काळानंतर शिवसेनेत प्रवेश केला.
शहाजीबापू यांनी शिवसेनेत प्रवेश का केला?
सांगोला हा शिवसेनेचा नाही. 2009 मध्ये सांगोल्यात शिवेसेनेला 1600 मते होती. मी 2013 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मला अनेकांनी पक्ष चुकला म्हणून सांगितलं. आबासाहेबांनीही मला पक्ष चुकल्याचं सांगितलं. त्यावेळी आबांना सांगितलं की, माझा पक्ष चुकला नाही. हे मी निश्चित सिद्ध करुन दाखवीन. शिवसेनेत मी स्वार्थाने, राजकारणासाठी अथवा आमदार होण्यासाठी आलो नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाले. हे मी बातम्यात पाहत होते. त्यांची अंत्ययात्रा निघाली.. तुफान गर्दी होती. त्यावेळी त्यांच्या बाळासाहेबांच्या प्रेताला अग्नी देताना उद्धव ठाकरे यांना पाहिलं अन् माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा प्रसंग सोडल्याशिवाय मी जिवनात कधीच रडलो नाही... आई-वडिलांच्या निधनानंतरही माझ्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते... पण त्या दिवशी मी रडलो. बायकोलाही आश्चर्य वाटले... तेव्हाच मी बायकोला सांगितलं मी शिवसेनाचा आमदार होणार... त्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश केला. आमचा तालुका काँग्रेस आणि शेतकरी कामकार पक्षाचा...पण 2014 मध्ये मला 76 हजार मते पडली. 2019 मध्ये मी निवडणूक जिंकली.