कंत्राटदार हर्षलनं 'जलजीवन'च्या कामाचे बिल न मिळाल्याने आयुष्य संपवलं; सतेज पाटलांनी घेतली कुटुंबीयांची भेट
Satej Patil met Construction contractor Harshal patil: विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.

Satej Patil met Construction contractor Harshal patil: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामे करूनही राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळाल्याने नैराश्यात येत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अवघ्या राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. इतकेच नव्हे तर कंत्राटदार संघटनेकडून सुद्धा त्यांचं बलिदान वाया जाणार नाही म्हणत सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत 90 हजार कोटींच्या बिलासाठी न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. पाटील यांनी हर्षलला न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला. पाटील यांनी भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे की सांगलीचा होतकरू आणि प्रामाणिक बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवनच्या कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली, ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. हर्षलच्या संघर्षाची, त्याच्या कामावरील निष्ठेची आणि प्रामाणिक प्रयत्नांची माहिती ऐकून मन सुन्न झाले.
सदाभाऊंकडून गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना कंत्राट पद्धतीमध्ये बदल करण्याची सुद्धा मागणी केली. खोत म्हणाले की, हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता. तो मुख्य कंत्रादाराकडून कामे घेऊन करत होता. त्यामुळे काही ठिकाणी कामे करून सुद्धा त्याला पैसे मिळाले नव्हते त्यामुळे मंत्री म्हणून काम करत आहात तर मंत्रालयामधील बारकावे तुम्ही माहित हवे होते, जबाबदारपणे वक्तव्य करून नवतरुणांना नाउमेद करण्याचा प्रकार असल्याने तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.
सांगलीचा होतकरू आणि प्रामाणिक बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी 'जलजीवन'च्या कामाचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षलच्या संघर्षाची, त्याच्या कामावरील निष्ठेची आणि… pic.twitter.com/cwa2o53lUs
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 25, 2025
नाहीतर अनुभव घ्यायला ते अमेरिकेत जाणार का?
दरम्यान, कंत्राट पद्धतीमध्ये बदलाची गरज असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सिव्हिल इंजिनिअरला पाच कोटींचे मर्यादा घालून लायसन दिले गेले पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. ते पुढे म्हणाले अनुभव जेव्हा विचारला जातो तर त्यांना कामे दिली तर त्यांच्याकडे अनुभव होईल, नाहीतर अनुभव घ्यायला ते अमेरिकेत जाणार का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. डिग्री चुलीत घालायची आहे का? असा सुद्धा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. अनेक ठिकाणी सांगलीमधील कामाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की चार ते पाच कंत्राटदार आहेत. मग त्यांना 30- 50 गावांची काम एकाच वेळी करता येतील का? अशावेळी कंत्राट पद्धत बदलल्यास निश्चित बदल होईल असं त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
























