लोकशाही लोकांची राहिली नाही, गुजराती व्यापारी लोकशाहीचे पालक; सुषमा अंधारेंनी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊतांची जोरदार बॅटिंग
मी अनेक वेळा अयोध्येत आंदोलनाला गेलोय, रक्तपात पाहिला आहे. 75 वर्षांपुर्वी असं काही नव्हतं..अटकेची भिती नव्हती..मात्र गेल्या 5-10 वर्षांत ही अटकेची तयारी ठेवावी लागते, असे संजय राऊत म्हणाले.
पुणे : लोकशाही लोकांची राहिली नाही, गुजरातचे व्यापारी लोकशाहीचे पालक झाले आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊतांची (Sanjay Raut) मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पुण्यात घेतली. या वेळी ते बोलत होते. तसेच बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते.पोटात एक ओठात एक असं नव्हतं, असेही ते या वेळी म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, मी बाळासाहेबांचा माणूस आहे, त्यामुळे मला कसलीच भीती नाही. बाळासाहेबांनी मला २८ व्या वर्षी सामनाचा संपादक केला. तोपर्यंत मला अग्रलेख कसा लिहितात हे माहिती नव्हतं. पण बाळासाहेबांनी संपादक केलं म्हणून मी विश्वास ठेवून जबाबदारी स्वीकारली. आमच्या माणसांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं म्हणून ते घाबरले.मी त्यांना म्हटलं बिनधास्त जा.. मी केवळ पत्रकारिता केली नाही, तर राजकारणासाठी जे काही लागतं ते सगळं केलं. आमच्यासाठी शिवसेना हा केवळ पक्ष नव्हता तर मराठी माणसांसाठी उभी केलेली चळवळ आहे. तुम्ही जेव्हा चळवळीत उतरता तेव्हा तुम्हाला भिती खुंटीला टांगून ठेवावी लागते
मी अनेक वेळा अयोध्येत आंदोलनाला गेलोय, रक्तपात पाहिला आहे. 75 वर्षांपुर्वी असं काही नव्हतं..अटकेची भिती नव्हती..मात्र गेल्या 5-10 वर्षांत ही अटकेची तयारी ठेवावी लागते.
बाळासाहेबांच्या पोटात एक ओठात एक असं नव्हतं : संजय राऊत
बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते. पोटात एक ओठात एक असं नव्हतं..त्यांना नाही म्हटलेलं आवडत नव्हतं. त्यांनी एखादं काम सांगितलं की त्यांना कारणं सांगितलेली आवडत नव्हती..तुम्ही ते काम यशस्वी करूनच परत या असे ते होते, मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या भाषेत तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटतं ते सांगावं. बाळासाहेबांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी सामना वृत्तपत्र काढला असेही संजय राऊत म्हणाले.
संसद आता लोकशाहीचं मंदीर राहिलं नाही : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, नार्वेकरांना पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातील चिकित्सा समितीचा अध्यक्ष करणं म्हणजे अत्यंत भ्रष्ट अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा प्रमुख बनवण्यासारखं आहे. राजकारणात नैतिकता नाही..हम करे सो कायदा अशी परिस्थिती आहे.
पूर्वी प्रश्न विचारले जायचे, नेते ऐकायचे..अटलजी, अडवाणीजी होते तेव्हा एकमेकांचा आवाज, गळा कसा आवळायचा याचेच प्रयत्न सुरू असतात. संसद आता लोकशाहीचं मंदीर राहिलं नाही. एक पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेच्या जोरावर फो़डून दुसऱ्या पक्षात आमदार नेले असं होतंय. जो व्यक्ती या सगळ्या खुनचा साक्षीदार आहे त्याला तुम्ही या संस्थेचा प्रमुख करता म्हणजे गंमत आहे.
राज ठाकरे अजूनही माझे चांगले मित्र: संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, मी राज ठाकरेंचा अजूनही चांगला मित्र आहे.राहुल गांधींशी चांगले संबंध आहेत. ओवैसीही माझे चांगले मित्र आहेत. राजकारणात तुम्हाला प्रखर टीकाकारांशी चांगले संबंध ठेवाावे लागतात. बाळासाहेब ठाकरे जेव्हा पेपर वाचायचे तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे अग्रलेख वाचायचे आणि तो लिहिणाऱ्याशी फोनवर बोलून चर्चा करायचे. ओवैसी बॅरिस्टर आहे, कायदा शिकलेले आहेत..त्यांचे मुद्दे मला पटत नसले तरी मी त्यांना देशाचा शत्रू ठरवणार नाही.
इंडिया आघाडी देशातील वाईट प्रकृतींचा नाश करणार : संजय राऊत
इंडिया आघाडीविषयी बोलताना सजय राऊत म्हणाले, मी गेली अनेक वर्ष राजकारणात आहे.आम्ही इंडिया आघाडी देशातील काही वाईट प्रकृतींचा नाश करण्यासाठी बनवली आहे. बाळासाहेब आंबेडकरांसोबत आमची युती आहे. त्यांची आणि आमची भूमिका सारखीच आहे. देशातील एकाधिकारशाही संपवायची आहे. त्यांची आमच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही त्यांना सन्माने बोलवलं आहे
एकनाथ शिंदेंकडे कुरघोडी करण्याची क्षमता नाही : संजय राऊत
एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र राज्याचे नेते नाही.ते घटनाबाह्य पद्धतीने त्या पदावर बसले आहेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरीही एकनाथ शिंदे बेकायदेशीर पद्धतीने मुख्यमंत्री झाले आहेत. स्वतःला नेता सिद्ध करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती सरकारच्या मंत्रिमंडळाची भूमिका असते. जेव्हा मुख्यमंत्र्याच्या भुमिकेला त्यांचा मंत्री विरोध करतो तेव्हा त्यांना बर्खास्त करण्याची शिफारस मुख्यमंत्री राज्यपालांकडे करू शकतात. एकनाथ शिंदेंकडे कुरघोडी करण्याची क्षमता नाही. आमचं हेच म्हणणं आहे की सरकार बरखास्त करा आणि निवडणुकांना सामोरे जा. तुम्ही सगळ्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या.