(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये बेवारसपणे प्रेतं फेकली नाही; संजय राऊतांचा मोदींच्या वक्तव्यावर घणाघात
Sanjay Raut Press Conferance : मोदींनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवलं. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी निषेध नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करायला हवी होती, राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Press Conferance : माझी पुढची भूमिका मी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्पष्ट करेन, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. भयापोटी आमच्यामागे राक्षस लावले जात असल्याचंही ते म्हणालेत. सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या, सरकार पडणार नाही. आणि जे सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बोलण्याचा अधिकार दिला असेल एखाद्या सरकारनं तर या देशाचा नागरिक म्हणून, संसदेचा सदस्य म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मलाही एक बाजू, सत्य हे लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे. मला जे काही बोलायचं होतं, ते मी बोललो. यापुढे जे काही बोलायचं आहे, ते मी महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबई शहरात जाऊन बोलीन."
शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही : संजय राऊत
"एक सांगतो कितीही प्रयत्न केला. खोटं करा, दबाव तंत्राचा अवलंब करा, खोटे पुरावे उभे करा, लोकांना धमक्या द्या, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या. पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत आता शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणखी काही मोठे नेते असतील, हा महाराष्ट्राचा बाणा आहे, तो राहील."
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेतं नाही वाहिली, राऊतांचा घणाघात
दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत
कोणाला गुडघे टेकायचे असतील, कोणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल त्यांनी काढावं इथे. महाराष्ट्र हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर? ज्या राज्यानं जगात सर्वोत्त काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये, समुद्रात फेकली नाही प्रेतं बेवारसपणे. किती खोटं बोलता आपण. एका तरी महाराष्ट्राती भाजप नेत्यानं निषेध नाही, निदान नाराजी तरी व्यक्त करावी. हे तुमचं महाराष्ट्र प्रेम, हा तुमचा महाराष्ट्र बाणा. दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांना देशाचा युगपुरुष मानला जातो. हे फक्त राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण बाणा आमच्याकडे आहे."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha