(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जींचा नकार, आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार: संजय राऊत
इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जींनी असमर्थता दर्शवली आहे. आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Assembly Elction Rsult) 'इंडिया आघाडी'ची (I.N.D.I.A. Alliance ) उद्या बैठक होणार आहे. चार राज्यातील निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जींनी असमर्थता दर्शवली आहे. आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अखिलेश यादव नाराज तर नितिशकुमार आजारी आहे. इंडिया आघाडीतील मतभेदावर चर्चा होईल, असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, सहा डिसेंबरला मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक आहे. निकाल काहाही लागले तरी ही बैठक आधीच ठरली होती. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. अखिलेश यादव नाराज आहते, ममता बॅनर्जी असमर्थ आहेत. नितिश कुमार यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ते येण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र आघाडीचा धर्म म्हणून उद्धव ठाकरे बैठकीत असणार आहेत. इंडिया आघाडीत कुठले मतभेद असतील, काँग्रेसने काय करायला हवं याच्यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरे संध्याकाळी दिल्लीत येतील आणि त्यानंतर थेट बैठकीला रवाना होती. या निकालांचा महाराष्ट्रावर काहीच परिणाम होणार नाही.
तिघांमध्ये झालेले लग्न टिकत नसते : राऊत
2019 साली फडणवीसांनी केलेलं 'मी पुन्हा येईन' विधान पुन्हा चर्चेत आलं आहे आणि त्याला कारण ठरले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे... बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असं भाकित केलं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये मुख्यमंत्री होणार याबद्दल मी काय सांगणार... या विषयी एकनाथ शिंदे, अजित पवार सांगू शकतील. हे लग्न तिघांमधे झाले आहे आणि तिघांमध्ये झालेले लग्न टिकत नसते. हे लग्न दोघांमध्ये व्हायला हवं होते. आम्ही महविकास आघाडी म्हणून एकत्र होतो पण आमचं चांगल सुरू होते, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेला डोळे वटरणारे ओंडके सोंडके 2024 ला नसतील
संजय राऊत म्हणाले, भाजप काहीच नव्हत तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन शिवसेनेने गावागावात पोहोचवले आहे. भाजप सुजला, फुगला,मोठा झाला. कोणामुळे मोठा झाला हे सगळ्यांना माहीत आहे. शिवसेनामुळे भाजप वाढली हे माहीत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा मग समजेल कोण कोणामुळे वाढेल हे समजेल. उपकार आणि कृतज्ञता या शब्दांच्या अर्थाची जान भाजपने ठेवावी. कोण कोणामुळे वाढलं याचे पुरावे तुमचेच लोक तुम्हाला देतील. शिवसेनेला डोळे वटरणारे ओंडके सोंडके 2024 ला नसतील.
उलटसुलट चर्चांना उधाण
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीस तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. उत्तरेकडील भागात आधीच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी ममता बॅनर्जींना उपस्थित रहावं लागणार आहे. तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांना आधी माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे याकाळात त्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत.