Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
खासदार संजय राऊतांचा (Sanjay Raut) जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज (11 नोव्हेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊतांचा (Sanjay Raut) जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज (11 नोव्हेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ झाली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.
ईडीचा नेमका युक्तीवाद काय?
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर
तब्बल 100 दिवसानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना बुधुवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी आले होते. शिवसैनिकांच्या गराड्यातच त्यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संजय राऊतांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
कोर्टाने ईडीला झापलं
संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक कऱण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक कऱण्यात आली. यात ईडीच्या बाजूने आरोपी पिक अँड चूज केल्याचं दिसतंय. जर कोर्टाने इ़डी आणि म्हाडाचं म्हणणं मान्य केलं तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखं होईल. सामान्य लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल.
महत्त्वाच्या बातम्या: