Sanjay Raut Majha Katta : पत्राचाळ कुठे आहे तेच माहित नाही, तुरुंगातील एकेक तास 100 तासांसारखा, माझा कट्ट्यावर संजय राऊत!
Majha Katta : एखाद्याशी संबंध असणं, नातं असणे म्हणजे गुन्हा असू शकत नाही. पण कुठेतरी विषय जोडायचा आणि त्याला आत टाकायचं, असे दिल्लीकरांचं सुरु आहे. कधी ना कधी या प्रवृत्तीचा अंत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Majha Katta : माझ्या आयुष्यात मी कधीच आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही. मी साधारण मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस आहे. मला ज्या प्रकरणी अटक केली ते प्रकरणच मला माहित नाही. पत्राचाळ कुठे आहे, हे मला माहित नाही. एखाद्याशी संबंध असणं, नातं असणे म्हणजे गुन्हा असू शकत नाही. पण कुठेतरी विषय जोडायचा आणि त्याला आत टाकायचं, असे दिल्लीकरांचं सुरु आहे. कधी ना कधी या प्रवृत्तीचा अंत आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते माझा कट्ट्यावर बोलत होते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. ईडीचा चौकशीचा ससेमिरा, त्यांना झालेली अटक. जामीनावर सुटका करताना कोर्टानं ईडीवर ओढलेले ताशेरे, राज्याच्या राजकारणात या गोष्टी बऱ्याच काळ चर्चेत राहतील. मुंबई महापालिकेच्या तोंडावर जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांची सुटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी संजिवनी ठरेल का? की त्यांची रोखठोक मतं आणि वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. महाविकास आघाडीच्या काळात भाजप, देवेंद्र फडणवीस आणि मोदींना लक्ष करणारे संजय राऊत त्यांचा जुनाच फॉर्म कायम ठेवतील का? की नवीन इनिंग सुरु करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली, यावेळी त्यांनी अनेक प्रश्नाची उत्तरे दिली. तुरुंगातील अनुभव, ईडी आणि राज्यातील सरकारवर त्यांनी आपलं मत नोंदवलं.
100 दिवसानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ज्या शिवसेनेत माझा जन्म झाला, त्या शिवसेनेचं नाव बदललं गेलं. ज्या शिवसेनेसाठी मी 40 वर्ष दिले, त्या शिवसेनेचं नाव चोरलं गेलं. ज्या धनुष्यबाणासाठी रस्त्यावर लढलो, ते राहिलं नाही. तुरुंगात असताना हे सर्व पाहत होतो. त्यावेळी तुरुंगाच्या गजावर हात ठेवत मी अस्वस्थ होत होतो, असे संजय राऊत म्हणाले.
तुरुंगात गेलो, मी रडत बसलो नाही. मला तुरुंगात का टाकताय? असं म्हटलं नाही. तुरुंगात गेल्यानंतर मरणार आहे? असे कधीही वाटलं नाही. तुरुंगात कधीही कोणतीही सुविधा घेतली नाही. पण तुरुंग हा तुरुंग असतो. तुरुंगात सलग 100 दिवस काढले. आर्थर रोड तुरुंगाबाहेर एक स्तंभ आहे, पण तो खराब झाला आहे. तो स्तंभ दुरुस्त करावा, असं मी तुरुंग अधिक्षकांना सांगितलं. तो स्तंभ कशासाठी आहे? तुरुंगात आलेले काही स्वातंत्र्य लढ्यातील लोक आले होते, त्यांच्या स्मरणार्थ हा स्तंभ आहे. पण या स्तंभाबाबत कुणाच्या लक्षात येत नाही. स्वातंत्र्य लढ्यानंतर अनेक लढाया झाल्या. त्यासुद्धा आपल्याला सत्य, स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावं लागतं, त्याची तयारी ठेवायला हवी. तुरुंग हे अनुभव घेण्याचं शिकण्याचं आणि बाहेरच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं व्यासपीठ आहे, असे राऊत म्हणाले.
एक वर्ष तुरुंगाबाहेर येणार नाही असं वाटलं होतं. काही जण दोन दोन वर्ष तुरुंगात आहेत. अनिल देशमुख वर्षभरापासून तुरुंगात आहेत. अनेकांचा दोष नसताना ते तुरुंगात आहेत. विशेष कायद्याचा सरकारकडून गैरफायदा घेतला जात आहे. राजकीय गैरवापरातून अनेकजण तुरुंगात आहेत. ब्रिटिशांच्या काळातही असे कायदे नव्हते. मी जेव्हा तुरुंगात होतो, तेव्हा विचार करत होतो, तुरुंगातील एक एक तास 100 तासांसारखा होता. लोकमान्य टिळक, सावरकर इतके दिवस कसे तुरुंगात राहिले असतील, याचा मी विचार करत होतो, असं राऊत यांनी सांगितलं.
कुणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये, अनेक चांगले उद्योगपती आतमध्ये आहेत. ज्यांच्याबद्दल आदर आहे, तेही लोक तुरुंगात आहेत. ते आतमध्ये जायला नकोत. मी तुरुंगात गेलो, लढलो बाहेर आलो. म्हणजे लढाई संपली नाही. कारण देशातील वातावरण असे आहे की, आपला राजकीय शत्रू हा देशाचा शत्रू आहे असं म्हणून कारवाई करायची अन् त्याला कायमचं संपवायचं. तो माझ्याविरुद्ध बोलतो, लिहितो, आंदोलन करतो.. म्हणून तो माझा दुश्मन नाही, देशाचा दुश्मन आहे. असं म्हणून तो संपला पाहिजे. या देशांमध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. ब्रिटिशांबद्दलही लोक बोलत होते, पण त्यांच्यावर अशा कारवाया झाल्याच नाहीत, अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली. तुरुंगात बोलण्याची परवानगी होती पण ते लिहीलेलं मला माझ्याकडेच ठेवायचं होतं. असंख्य लोकं आहेत महाराष्ट्रात माझ्यासारखे माझ्या स्टाईलने लिहीणारे त्यांनी सामना जिवंत ठेवला.
मुंबईच्या पुनर्विकासासाठी त्यांनी जे निर्णय घेतले आहेत. गरीबांच्या घरांसंदर्भात जे निर्णय घेतले आहेत तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं कौतुक केलं.