एक्स्प्लोर
ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना 5 रुपयात सॅनिटरी पॅड
राज्यभरात एका चित्ररथाद्वारे सॅनिटरी नॅपकीनविषयी जनजागृती केली जात आहे, ज्याला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या योजनेची घोषणा केली.
बीड : ग्रामीण भागातील महिला आणि मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. राज्यभरात एका चित्ररथाद्वारे सॅनिटरी नॅपकीनविषयी जनजागृती केली जात आहे, ज्याला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय.
मासिक पाळीच्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर गैरहजर राहत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं. या काळात योग्य ती स्वच्छता न बाळगल्यामुळे महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि विद्यार्थिनींना 5 रुपयात सॅनिटरी नॅपकीन वाटण्यात येणार आहे.
अस्मिता योजनेअंतर्गत मुंबईची एक टीम पथनाट्याच्या माध्यमातून महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅडचं महत्व समजून सांगत आहे. सॅनिटरी पॅडचा उपयोग आरोग्यासाठी चांगला असून मुलींनी न भीता आणि न लाजता याचा वापर करायला हवा, असं आवाहन केलं जात आहे. 150 गावांमध्ये हे पथनाट्य सादर होणार असून अस्मिता योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात अनेक मुली मासिक पाळी आल्यावर आपल्या कुटुंबात किंवा मैत्रिणींना सांगत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. मात्र या पथनाट्याच्या माध्यमातून मुलींमध्ये असलेली भीती दूर होत असून त्यांना सॅनिटरी पॅडचं महत्त्व समजत आहे.
काय आहे अस्मिता योजना?
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या योजनेची घोषणा केली. ‘पॅडमॅन’ अक्षय कुमारच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील महिला आणि 11-19 वयोगटातील शाळकरी मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे. मुलींना 8 सॅनिटरी नॅपकीनचा पॅक केवळ 5 रुपयांमध्ये देण्यात येईल.
या योजनेमध्ये प्रत्येक जण आपलं योगदान देऊ शकतो. अभिनेता अक्षय कुमारनेही तब्बल 10 हजार मुलींच्या एका वर्षाच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी किमान एका मुलीला स्पॉन्सर करणं गरजेचं आहे. एका मुलीचा वर्षभराचा खर्च साधारणपणे 182 रुपये आहे. आतापर्यंत 500 पेक्षा अधिक व्यक्तींनी अकरा हजारपेक्षा जास्त मुलींच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement