Sangli News : मृत मतदार जिवंत झाले आणि मतदान करून गेले; कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीतला प्रकार उघड
Sangli News : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कवठे महांकाळ नगर पंचायत निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Sangli News : राज्यभरात चर्चा झालेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. नगरपंचायत निवडणुकीत चक्क मयत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन प्रभागातील पराभूत उमेदवारांनी जिल्हा न्यायलयात धाव घेतली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत मधील प्रभाग १० मध्ये ७ मयत व्यक्तीच्या नावे बनावट मतदान झाले आहे. प्रभाग १६ मध्ये मयत, दुबार, चुकीचे असे १३ बनावट मतदान झाल्याचे समोर आले आहे. बनावट मतदान झाल्याने शेतकरी विकास आघाडी व आरपीआयच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. यामुळे प्रभाग १० व १६ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी यासाठी जिल्हा न्यायालयात पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केल्याची ॲड. अमित शिंदे यांनी माहिती दिली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये शेतकरी विकास आघाडीतर्फे उमेदवारी करणाऱ्या उदय शिवाजीराव शिंदे यांनी निवडून आलेले उमेदवार अब्दुलहमीद ब्रदुद्दीन शिरोळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केलेली आहे. प्रभाग क्रमांक दहामध्ये 7 मयत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी केली नसल्याचा गैरफायदा घेऊन सात मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झालेले आहे. ही बनावट सात मते मिळाल्यामुळे शिरोळकर विजय झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पराभूत उमेदवार शिंदे यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला आहे. या मयत मतदानामध्ये निवडून आलेले उमेदवार शिरोळकर यांचे मयत वडील व दोन चुलते यांच्या नावाने देखील बनावट मतदान झाले आहे. ज्या मयत व्यक्तींच्या नावे बनावट मतदान झाले आहे त्यांच्या मुलांनी न्यायालयामध्ये शपथपत्र सादर केले असून उदय शिंदे यांच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे प्रभाग 10 ची निवडणूक रद्द होऊन शेतकरी विकास आघाडीचे उदय शिंदे यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधील आरपीआयचे उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे यांनी विजयी उमेदवार संजय विठ्ठल वाघमारे व इतर पराभूत उमेदवार यांचे विरुद्ध दाद मागितली आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 3 मयत व्यक्तींचे नावे बनावट मतदान झाले आहे. तसेच तीन व्यक्तींची प्रभाग 16 च्या मतदार यादी मध्ये दुबार नावे आली असून त्यांनी त्या दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे. तसेच पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीचे फोटो, स्त्रीच्या ठिकाणी पुरुषाचा फोटो अशी चार चुकीची नावे असतानादेखील त्या नावावर बनावट मतदान झाले आहे. अशा प्रकारे एकूण 13 जणांनी बोगस मतदान झाले आहे.
नानासाहेब वाघमारे यांचा केवळ नऊ मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक रद्द करून नानासाहेब वाघमारे यांना विजय घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दोन्ही तक्रारींमध्ये बनावट मतदानाचा सबळ पुरावा हजर केलेला असून निवडणूक निर्णय, अधिकारी, कवठेमहांकाळचे मुख्याधिकारी यांना देखील यामध्ये पक्षकार केले आहे. निवडणुकीमध्ये दुबार, मयत व चुकीचे मतदान रोखण्यासाठी पडताळणीची तरतूद असताना देखील त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने निवडणूक सदोष झालेली असल्याने तिला न्यायालयात आव्हान दिले असल्याचे तक्रारदारांचे वकील अमित शिंदे यांनी सांगितले.
कडेगाव नगरपंचायतीतही बोगस मतदान
कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तीन प्रभागांमध्ये दुबार मतदान झाल्याची तक्रार आहे. प्रभाग 13, 14 व 17 मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करून काँग्रेस उमेदवारांना विजयी घोषित करावे यासाठी उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.