(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई करण्यापूर्वीच सांगलीत आमदार विश्वजित कदमांनी घेतला मोठा निर्णय!
Sangli Loksabha : ज्या विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी गल्ली ते दिल्ली प्रतिष्ठा पणाला लावली होती तेच विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.
सांगली : सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांनी अखेर बंडाचा पवित्र कायम ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याबाबत सांगलीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगलीची लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाली आहे.
महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजपचे खासदार संजय काका पाटील आहेत, तर विशाल पाटील अपक्ष रिंगणात असणार आहेत. त्यामुळे सांगलीसाठी तिरंगी लढत मानली जात असली तरी तब्बल 21 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक बूथवर दोन ईव्हीएम असणार आहेत.
25 एप्रिल रोजी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा
आता जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या विश्वजित कदम यांनाच आता विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. विश्वजीत कदम यांनी 25 एप्रिल रोजी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता ज्या विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी गल्ली ते दिल्ली प्रतिष्ठा पणाला लावली होती तेच विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.
सांगली लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दाखवण्यासाठी काँग्रेसकडून प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसकडून रॅली आयोजित करण्यात आल्याने विशाल पाटील यांच्यासमोर आता आव्हान उभे ठाकलं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने विशाल पाटील यांची मनधरणी
विशाल पाटील यांना काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सांगून सुद्धा कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने विशाल पाटील यांची मनधरणी सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांकडून आमदार विश्वजित कदम यांच्यामार्फत मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मात्र विशाल पाटील यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, हे आजच्या माघार न घेण्यावरून स्पष्ट झालं आहे. दिल्लीमधील काँग्रेस हायकमांडकडून सुद्धा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यामार्फत विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. विधानपरिषदेची ऑफरही देण्यात आली. मात्र, यामध्ये यश आलेलं नाही. विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल कारवाईचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलं आहे.