विश्वजीत कदमांना भाजपची ऑफर? की कदमांचीच पावलं भाजपकडे? सांगलीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय...
दिग्गज नेत्यांना भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहेत. यामध्ये विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam)यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
Sangli Politics : शिवसेनेत बंड करून भाजपसोबत हात मिळवणी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस (Eknath Shinde- Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेस पक्षाला हादरा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसमधील (Congress) अनेक दिग्गज नेत्यांना भाजपकडून (BJP) पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले कै. पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांचे पुत्र आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam)यांच्या नावाची देखील चर्चा आहे. शिंदे गटासोबत स्थापन केलेलं सरकार जोपर्यंत टिकेल तोपर्यंत काँग्रेसमधील दिग्गज नेते भाजपमध्ये सामावून घेण्याचे हालचाली दिसत आहेत.
राज्यामध्ये काँग्रेस फोडण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून विधान परिषद निवडणुकीपासूनच सुरू असून त्या अंतर्गत काँग्रेसमधील वजनदार नेत्यांशी संपर्क साधण्याची मोहीम सुरूय. यातीलच एक नाव आहे आमदार विश्वजीत कदम. महाविकास आघाडीमध्ये मंत्री राहिलेले आणि काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते राहिलेले पतंगराव कदम यांचे पुत्र. खरंतर पतंगराव कदम यांचा काँग्रेस पक्षामधील राजकीय वारसा विश्वजीत कदम पुढे चालवत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि काही महिन्यातच काँग्रेस मधील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशाच्या ऑफर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात विश्वजीत कदम यांचे देखील नाव आघाडीवर आहे. मात्र विश्वजीत कदम यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आहे की बदलती परिस्थिती पाहता विश्वजीत कदमच भाजपसोबत जाण्यास उत्सुक आहेत हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटी नेमक्या कोणत्या विषयावर होत्या हे ही पाहणे गरजेचे आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वजित कदम यांच्याशी बंद दाराआड चर्चा झाल्या होत्या.
विश्वजित कदम यांना जर भाजपमध्ये घ्यायचे म्हटले तर भाजपला कदम यांचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील पारंपरिक विरोधक गटाचे आणि तेथील स्थानिक राजकारण लक्षात घ्यावे लागेल. शिवाय कदम यांच्याबरोबर त्याचे मावस बंधू आणि काँग्रेसमधीलच जतचे आमदार विक्रमसिंह सावंत याची पुढची राजकीय वाटचाल काय असेल हे ही पाहावे लागणार आहे.
विश्वजित कदम यांच्याबाबतीत भाजपच्या नेत्यांचा पहिल्यापासून सॉफ्ट कॉर्नर!
विश्वजित कदम यांच्याबाबतीत भाजपच्या नेत्यांचा पहिल्यापासून सॉफ्ट कॉर्नर असल्याच्या देखील पाहायला मिळालंय. कारण पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपमधल्या स्थानिक गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या हालचाली झाल्या होत्या. यात भाजपच्या उमेदवारांचा विजय होईल असाही भाजपच्या स्थानिक नेत्यांना विश्वास होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळी या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांच्या विरोधात उमेदवारी न देण्याचे ऐनवेळी जाहीर केलं आणि विश्वजित कदम बिनविरोध आमदार झाले. त्यानंतर 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पलूस कडेगावची जागा भाजप शिवसेनेच्या युतीत भाजपने ती न मागता शिवसेनेच्या वाट्याला दिली आणि या निवडणुकीत विश्वजीत कदम दीड लाखांहून अधिक विक्रमी मताने निवडून आले होते.
भाजपला विश्वजीत कदम यांच्यासारख्या युवा चेहऱ्याची गरज
दुसरीकडे राज्यामध्ये भाजपकडे सध्या साठीच्या पुढील नेतृत्वाचा भरणा आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणखी विस्तारासाठी ही वाव आहे. त्यासाठी त्यांना विश्वजीत कदम यांच्यासारख्या युवा चेहऱ्याची गरज आहे. साखर कारखाना, शैक्षणिक संस्थांचे जाळे, राज्य पातळीवर युवकांचे संघटन, या बाबींमुळे भाजपला विश्वजित कदम हवे आहेत, अशी चर्चा आहे.
पतंगराव कदम हे काँग्रेस मधील वजनदार नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र मुख्यमंत्री पदासाठी पतंगराव कदम यांना कॉंग्रेस पक्षाने न दिलेल्या संधीची सल पतंगरावांसह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम होती. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये विश्वजित कदम यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. हा सगळा इतिहास, बदललेली राजकीय परिस्थिती आणि सुरू असलेल्या काही कारवाया पाहता विश्वजित कदम यांनाच कॉंग्रेस मधून बाहेर पडावेसे वाटतेय का? आणि यातूनच त्याच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा सुरू झालेत का यावर आता विश्वजित कदमच उत्तर देऊ शकतील.