एक्स्प्लोर
Advertisement
चार वर्षांच्या चिमुकलीने वाचवले धाकट्या भावाचे प्राण
सुजलचा तोल जाऊन पाण्यात पडला होता. भाऊ पाण्याच्या टाकीत पडत असतानाच स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हाती त्याचा एक पाय आला.
सांगली : बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावाच्या खांद्यावर असते, असं पूर्वापार मानलं जातं. काळ बदलला तसं दोघंही एकमेकांच्या अडीअडचणीला धावून येऊ लागले. चिमुरड्या भावाचा जीव वाचवणासाठी चिमुकली बहीण धावून आल्याचं उदाहरण सांगलीत पाहायला मिळालं आहे.
अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचले. सांगलीत पलूस तालुक्यातील वसगडे गावात ही घटना घडली आहे.
वसगडेमध्ये सुनील शिरोटे आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत राहतात. सुनील यांना स्नेहल ही चार वर्षाची मुलगी, तर सुजल हा दोन वर्षाचा मुलगा.
रविवारी सकाळी आठ वाजता हे संपूर्ण कुटुंब कामात व्यस्त होतं. घरात स्नेहल आणि सुजल ही दोघं भावंडं खेळत होती. खेळता खेळता दोघं अंगणात गेली. अंगणाच्या बाहेरील बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाजवळ स्नेहल बसली होती, तर सुजल अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला.
पाचशे लिटर क्षमतेच्या या टाकीमध्ये जवळपास चारशे लिटर पाणी होतं. टाकीच्या कट्ट्यावर उभं राहून तो पाण्याने भरलेल्या पाण्याच्या टाकीत बघत होता. चिमुरड्या स्नेहनले हे पाहिले तिला संभाव्य धोक्याची जाणीव झाली.
स्नेहल धावतच सुजलकडे आली, पण तोपर्यंत सुजलचा तोल जाऊन पाण्यात पडला होता. भाऊ पाण्याच्या टाकीत पडत असतानाच स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या हाती त्याचा एक पाय आला. सुजलचं तोंड पाण्यातच बुडालं होते. तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याचा श्वास गुदमरत होता.
हे पाहून स्नेहल जिवाच्या आकांताने ओरडली. तिचा आवाज ऐकून घरातील मोठी माणसं बाहेर धावत आली. समोरचं दृश्य पाहून क्षणभर त्यांच्या अंगावर शहारे आले. तात्काळ त्यांनी सुजलला पाण्यातून बाहेर काढले. त्याच्या पोटात पाणी गेले होते. त्याला उलटं झोपवून पाठ थोपटून पोटातील पाणी बाहेर काढलं आणि सुजलचे प्राण वाचले.
शिरोटे कुटुंबीयांवर आलेलं दु:खाचं सावट चार वर्षांच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे टळलं. मुलीच्या या धाडसामुळे तिच्या वडिलांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या होत्या.
स्नेहलचं वय अत्यंत कमी असूनही तिने दाखवलेली सतर्कता, तत्परता, धाडस आणि बुद्धिकौशल्य थक्क करणारं होतं. मोठ्या माणसांनाही अशा प्रसंगात बऱ्याचदा काही सुचत नाही. त्यामुळे दुर्दैवी घटना टाळता येत नाहीत. अशा परिस्थितीत स्नेहलचं हे धाडस साऱ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement