ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले, विखेंची मध्यस्ती, वादावर पडदा
ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले असून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानं आंदोलन रद्द करण्यात आले आहे.
शिर्डी : ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साईसंस्थान नरमले असून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानं आंदोलन रद्द करण्यात आले आहे. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्तीने या वादावर पडदा पडला असला तरी मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांच्या काळात अनेक वाद निर्माण झाले असून पत्रकारांसाठी सुद्धा नियमावली बनविण्यासाठी मसुदा तयार करण्यात आलाय.
ड्रेस कोडचे फलक लावल्यानंतर तृप्ती देसाई यांनी केलेला वाद, 25 हजार रुपये भरा व आरतीचा पास मिळविण्याचा भक्तांचा आरोप, 31 डिसेंबरला नगराध्यक्ष दर्शना वरून झालेला वाद, पत्रकारांसाठी अनेक निर्बंध असलेली नियमावली व त्यानंतर ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा अश्या अनेक घटनांनी साई संस्थान चर्चेत राहिलं असून 8 महिन्यानंतर मंदिर सुरू झाल्यावर कोरोनाच्या नावाखाली अनेक मनमानी निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे गवत असल्याच समोर आलंय. मंदिर परिसरातील सर्व प्रवेशव्दार उघडण्याच्या व ग्रामस्थांना दर्शन सुलभतेने घेता यावे या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी शिर्डी बंदचा इशारा देताच साई संस्थान बॅकफुटवर गेले असून विखेंच्या मध्यस्तीनंतर या मागण्या मान्य झाल्या आहेत
मंदिर सुरू झाल्यावर पत्रकार कोरोना नियमांचा अवलंब करीत वृत्तांकन करत होते. मात्र आता या साई संस्थानच्या समितीने पत्रकारांसाठी नियमावली करण्याचा नवीन घाट घातला असून उच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या समितीने 11 कलमी नियमावली तयार केली असून त्याचा ठराव करत उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे. हे सगळं प्रकरण आता पत्रकारांना समजताच त्याला विरोध देखील सुरू झाला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने अशा निर्बंधाचा विरोध करण्याची भूमिका शिर्डी प्रेस क्लबच्या वतीनं घेण्यात आली आहे.
कोरोना काळात दर्शन व्यवस्था व इतर बाबतीत आचारसंहिता असली पाहिजे मात्र अशा पद्धतीनं जाचक अटी घालून नियमावली बनवून पत्रकारांच्या हक्काची पायमल्ली होणार असेल तर ते चुकीचे आहे असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद आहेर यांनी मांडलं आहे. दरम्यान या नवीन नियमावली बाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी समर्थन केले असून पत्रकारांना कोणतेही बंधन घालणार नसल्याचं सांगितलं आहे. दक्षिण भारतातील मंदिर व्यवस्थेत जसं काम चालतं तसं काम आम्हाला करायचे आहे. हे सांगताना पत्रकारांना कुठलीही आडकाठी अथवा निर्बंध नसतील असं सांगितलं आहे.