Majha Katta : संकटावर मात करत सह्याद्री फार्मची उभारणी, विलास शिंदेंनी सांगितले अनुभव...
कृषी उद्योजक आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी 'माझा कट्ट्यावर' त्यांचे कृषी व्यवसायातील अनुभव सांगितले.
Majha Katta : 2004 साली द्राक्ष निर्यात करण्याचा प्रयत्न केला. चार कंटेनर नेदरलँडला पाठवले. मात्र, तो प्रयत्न फसला. 32 लाखाच्या चार कंटेनरपैकी तीन कंटेनरचे पैसे समोरच्या आयातदाराने दिलेच नाहीत. 20 लाखांचा पहिल्याच प्रयत्नात तोटा झाल्याची माहिती कृषी उद्योजक आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी दिली. विलास शिंदे हे 'माझा कट्ट्यावर' उपस्थित होते. यावेळी सह्याद्री फार्मची जडण घडण, कृषी व्यवसायातील त्यांचे अनुभव त्यांनी सांगतले. पहिल्याच प्रयत्नात आगीतून उठून फुफुट्यात पडण्याचा प्रकार झाला होता. तोच खरा टर्निंग पॉईंट होता. त्याच प्रसंगाने जगण्याचा नवा दृष्टीकोण दिल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली. आज कोणीही सह्याद्री फार्मवर आला तर त्याला युरोपमध्ये आल्यासारखे वाटते असेही शिंदेंनी यावेळी सांगितले. 'माझा कट्टा; हा रविवारी सकाळी 9 वाजता एबीपी माझावर प्रसारित होणार आहे.
2010 ला सह्याद्रीची स्थापना
शेतात जो माल आहे तसाच बाजारपेठेत राहिल असे नाही. त्यामध्ये थोडाफार बदल होणार. द्राक्षाच्या गुणवत्ता कमी झाल्याचे कारण त्यावेळी मला नेदरलँडला गेल्यावर सांगण्यात आले. तुमच्या पहिल्या कंटेनरमध्ये व्यवस्थित द्राक्ष नसल्याने मला पुन्हा तुमचे द्राक्ष नको असे त्यांनी सांगितले. खर कारण म्हणजे तेथील मार्केट पडल्यामुळे त्यांनी गुणवत्तेचा विषय सांगिल्याचा अनुभव शिंदे यांनी सांगितला. दरम्यान, 2004 ते 2010 पर्यंत सुधारणा करण्याच्या दृष्टीने आम्ही बरेच काम केले. सुरुवातीच्या काळात अनेकवेळा अपयश आले. मात्र, त्यावर मात करत काम करत गेलो. नवनवीन प्रयोग करत गेल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर 2010 ला सह्याद्रीची स्थापना केली. त्यानंतर 100 टक्के द्राक्ष व्यवस्थित कशी राहिल, पॅकिंग कसे उत्तम करता येईल यावर भर दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज जगातील 42 देशांमध्ये द्राक्षांची निर्यात करत असून, सह्याद्रीची फार्मची साडेसातशे कोटींची उलाढाल आहे.
10 शेतकऱ्यांच्या ग्रुपने सुरुवात
2002 ते 2003 साली डेअरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यवसाय अडचणीत आला. त्यानंतर कर्ज वाढत गेले. त्या अनुभवातून बरेच काही शिकता आले. त्यानंतर मग 2004 पासून ग्रुप वाढवायचा, त्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. 10 शेतकऱ्यांच्या ग्रुपने पहिल्यांदा सुरुवात केली. त्यानंतर ग्रुप वाढत गेला. त्यानंतर हळूहळू आम्ही जागतिक बाजाराशी स्पर्धा करु लागलो. द्राक्षामध्ये इतर देशांशी स्पर्धा करु लागलो असे शिंदे म्हणाले. तिकडचे स्केल आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याप्रमाणे आम्ही काम सुरु केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अडचणीच्या काळात जमिन विकण्याची वेळ आली
अडचणीच्या काळात जमीन देखील विकण्याची वेळ आली. पण शेतकऱ्यांची सगळी देणी दिल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. कारण झालेला व्यवहार पूर्ण करणे गरजेचे होते. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास बसला. अनुभवातून विश्वास तयार झाला. सह्याद्री निर्माण होतानाच एक विश्वास निर्माण झाला होता. सध्या सह्याद्रीचे 200 गावातील शेतकऱ्यांशी सह्याद्रीचे जाळे आहे. 2010 ला सह्याद्रीची सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या पाच ते सहा वर्षाच्या काळात सदस्य शेतकरी वाढत गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.