कामकाज 50 दिवसही नाही, मग न चालवणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा महाल कशासाठी? सामनातून हल्लाबोल
Saamana Editorial on PM Modi : सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. तसेच, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

Saamana Editorial On New Parliament Building Inauguration: देशाला नवीनं संसद भवन (New Parliament Building Inauguration) मिळालं. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भव्यदिव्य संसद भवनाचं उद्घाटन केलं. मात्र, या सोहळ्यावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला होता. अशातच आता संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन सोहळ्यावरु सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातूनही सत्ताधारी भाजपचा समाचार घेण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. तसेच, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना सामनाने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलनाही केली आहे.
दिल्लीत मोदी राज आल्यापासून संसदेचं कामकाज जवळपास बंद असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे. पंडित नेहरूंच्या काळात लोकसभेचं कामकाज वर्षातून किमान 140 दिवस चालायचं. आता ते 50 दिवसही चालत नाही, असंही सामनात म्हटलं आहे. सरकारला ज्यांची भीती वाटते त्यांच्या घरी पोलीस, ईडी पोहोचते आणि त्यांना अटक होते. या जुलूमशाहीविरोधात आवाज उठवण्याची सोय संसदेत नाही. मग नव्या संसदेचा महाल काय कामाचा? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.
सामनात पुढे म्हटलंय की, "माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कोणी घेऊ नयेत. नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे 'सब कुछ मोदी आणि फक्त मोदी' असाच होता. फोटो आणि इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे."
काय म्हटलं सामनाच्या अग्रलेखात? जाणून घेऊया सविस्तर
'नवा संसद महाल! मोदींचा वास्तू प्रवेश!' या मथळ्याखाली सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.
ऐतिहासिक संसदेला टाळे लावून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मालकीची वास्तू असल्याच्या थाटात नवा भव्य संसद महाल उभा केला. त्या महालात बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यास लोकशाहीचे मंदिर म्हणू नका . त्या महालात सरकारला धारदार प्रश्न विचारण्याची मुभा नसेल तर ' सत्यमेव जयते ' चा बोर्ड खाली उतरवा . त्या महालात राष्ट्रीय प्रश्नांवर गर्जना करण्यापासून रोखणार असाल तर संसदेच्या घुमटावरील तीन सिंहांचे भारतीय प्रतीक झाकून ठेवा ! नवे संसद भवन म्हणजे फक्त दगड , विटा , रेतीने बांधलेली नक्षीदार इमारत नाही . त्या इमारतीत देशाच्या लोकशाहीचे पंचप्राण गुंतले आहेत . आम्ही त्या मंदिरास साष्टांग दंडवत घालीत आहोत ! मोदी त्यांच्या स्वभावानुसार वागले . देशाला कर्तव्य पार पाडावे लागेल .
माणसाच्या स्वभावाला औषध नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे असेच का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट कोणी घेऊ नयेत. नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे 'सब कुछ मोदी आणि फक्त मोदी' असाच होता. फोटो व इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे. राष्ट्रपतींनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले असते, त्यांच्याबरोबर लोकसभेचे अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती, दोघांच्या मधोमध पंतप्रधान मोदी व त्यांच्या उजव्या बाजूला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे असे चित्र त्या लोकशाहीच्या मंदिरात दिसले असते तर मोदींचे मोठेपण कमी झाले नसते. मोदींनी हे सर्व घडवून आणले असते तर मोदी बदलले असेच जगाला वाटले असते, पण आपला स्वभाव बदलतील ते मोदी कसले? मोदी हे मोदींसारखेच वागतात. तसेच ते वागले. राष्ट्रपती नाहीत, उपराष्ट्रपती नाहीत, विरोधी पक्षनेते नाहीत. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना नाइलाजाने बाजूला ठेवले. ''नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे हो।s।s'' अशी निमंत्रणाची हाळी मारण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून ओम बिर्ला साहेब होते. तर असा हा एकंदरीत कारभार आहे. मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्वतःच जाहीर केले होते की, ''देशाचे संविधान हाच एकमेव पवित्र ग्रंथ आहे. त्या पवित्र ग्रंथाचा आदर आपले सरकार करेल.'' मोदी यांनी पंतप्रधानपदावर येण्याआधी प्रथम संसदेत प्रवेश केला तेव्हा अत्यंत भावूक होत संसदेच्या पायरीवर डोके टेकवून अश्रू ढाळले. या संसदेचे पावित्र्य राखीन, सगळय़ांना समान न्याय देईन व त्यासाठी संसदेला बळ देईन असे त्यांचे मन त्यांना सांगत असावे, पण फक्त आठ वर्षांत त्यांनी त्याच संसदेस टाळे ठोकले व आपल्या मर्जीने संसदेची नवी इमारत उभी केली. एखाद्या महाराजाने आपल्या राजमहालाचा वास्तुप्रवेश करावा तसा त्याच्या उद्घाटनाचा सोहळा केला.
लोकशाहीच्या या मंदिरातून
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अदृश्य होते. मग त्या उद्घाटन सोहळय़ास कोण उपस्थित होते? नव्या संसद भवनाच्या सोहळय़ात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांना फाटा देऊन अंधश्रद्धा, धर्मकांड यांना महत्त्व देणाऱ्यांचा भरणा होता. राजदंडही आता आला. म्हणजे यापुढे एक प्रकारे राजेशाहीची सुरुवात झाली. दिल्लीत लोकशाहीच्या नावाखाली नव्या बादशाहीचा राजदंड पोहोचला आहे. विज्ञान, संशोधन न मानणाऱ्या लोकांच्या गराडय़ात मोदी आले, त्यांनी धर्मकांड केले. यास हिंदुत्व म्हणावे की राज्याभिषेकाचा सोहळा? हिंदुत्वात श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. भारतीय संसदेचे हे कोणते रूप आपण जगाला दाखवत आहोत? राष्ट्रपतींना आमंत्रण नाही, पण असंख्य साधू व मठाधीशांना नव्या संसद महालाच्या वास्तुशांतीस बोलावण्यात आले. एक हजार कोटींचा 'महाल' लहरी राजाच्या इच्छेखातर बनवण्यात आला व त्यातून लोकशाहीच हद्दपार झाली अशी नोंद इतिहासात होईल. दिल्लीत मोदींचे राज्य आल्यापासून संसदेचे कामकाज जवळ जवळ बंदच असते. पंडित नेहरूंच्या काळात वर्षाला 140 दिवस किमान लोकसभेचे कामकाज चालत असे. आता ते 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य संसद महाल कशासाठी? पंतप्रधान नेहरू जास्तीत जास्त काळ संसदेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित राहत, विरोधी पक्षनेत्यांची भाषणे ऐकत. नेहरू प्रश्नोत्तरांच्या तासालाही आवर्जून उपस्थित राहत व सदस्यांच्या अनेक प्रश्नांना स्वतः उत्तरे देत. पंतप्रधान मोदी प्रश्नोत्तरांच्या तासाला कधीच हजर राहिले नाहीत व प्रश्नांना उत्तरे देण्याचा तर प्रश्नच उद्भवला नाही. चर्चेपासून त्यांनी सतत पळ काढला. संसदेत तेव्हा सर्वच विषयांवर चर्चा होत असे व पंतप्रधान चर्चेला उत्तेजन देत असत. आज विरोधकांनी अडचणीच्या विषयावर चर्चा मागितली की, सत्ताधाऱ्यांकडूनच संसद बंद पाडली जाते. विरोधी बाकांवरील सदस्यांना
सापत्न वागणूक
दिली जाते. हे लोकशाहीचे चित्र नाही. काल मोदी यांनी सांगितले की, ''नवे संसद भवन म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे. हे मंदिर भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करून कोटय़वधी जनतेला सामर्थ्य देवो!'' पण संसदेचा 'कैलास' करून, विज्ञानाचा मार्ग सोडून विकास कसा होणार? नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधीनुसार झाले. मोदी यांनी लोकसभेत सन्गोलची म्हणजे राजदंडाची स्थापना केली, पण देशातील राज्यकारभारात राजधर्माचेच पालन होत नसेल तर तो शोभेचा राजदंड काय कामाचा? मोदी सरकारच्या काळात देशातील सार्वजनिक उपक्रम, विमानतळे, बंदरे सर्व काही मोदींच्या मित्रांच्या हवाली केले गेले. मोदीमित्र अदानी यांनी देश कसा लुटला, याच्या कहाण्या प्रसिद्ध झाल्या, पण विरोधी पक्षांनी त्या लुटमारीवर चर्चेची मागणी करताच संसद बंद पाडण्यात आली. उद्या ही नवी संसद चालविण्यासाठी मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या हवाली केली जाईल. देशात आज भीतीचे वातावरण आहे. सरकारला ज्यांची भीती वाटते त्यांच्या घरी पोलीस व ईडी पोहोचते व त्यांना अटक होते. या जुलूमशाहीविरोधात आवाज उठवण्याची सोय संसदेत नाही. मग नव्या संसदेचा महाल काय कामाचा? ऐतिहासिक संसदेला टाळे लावून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मालकीची वास्तू असल्याच्या थाटात नवा भव्य संसद महाल उभा केला. त्या महालात बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यास लोकशाहीचे मंदिर म्हणू नका. त्या महालात सरकारला धारदार प्रश्न विचारण्याची मुभा नसेल तर 'सत्यमेव जयते'चा बोर्ड खाली उतरवा. त्या महालात राष्ट्रीय प्रश्नांवर गर्जना करण्यापासून रोखणार असाल तर संसदेच्या घुमटावरील तीन सिंहांचे भारतीय प्रतीक झाकून ठेवा! नवे संसद भवन म्हणजे बादशहाचा महाल नाही. देशाच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतीक आहे. ती फक्त दगड, विटा, रेतीने बांधलेली नक्षीदार इमारत नाही. त्या इमारतीत देशाच्या लोकशाहीचे पंचप्राण गुंतले आहेत. आम्ही त्या मंदिरास साष्टांग दंडवत घालीत आहोत! मोदी त्यांच्या स्वभावानुसार वागले. देशाला कर्तव्य पार पाडावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
