(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघाली आहे; शिवसेना नेत्यांचे टीकास्त्र
RSS Shivsena : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महापालिकेला पाठवलेल्या पत्रावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल आहे.
RSS Shivsena : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा बाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघाला असून त्यांनी बहुजनांबद्दल द्वेषाची भूमिका बदलावी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. शिवाजी पार्क येथे असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे संघाला शाखेच्या उपक्रमात अडचण होत असल्याचे पत्र संघाच्या दादर शाखेने महापालिकेला पाठवले आहे. 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तावर आता शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ आहे. या स्मृतीस्थळाजवळच्या जागेजवळ 1936 पासून संघाची शाखा भरली जात असल्याचा दावा संघाने केला होता. स्मृतीस्थळामुळे उपक्रमांना अडथळा होत असून पर्यायी जागा देण्याची मागणी महापालिकेकडे संघाने केली आहे.
बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की, संघाला ही जागा भाड्याने मिळाली असेल असं मी मान्य करत नाही. त्यावेळी नगर पालिका ऍक्ट अस्तित्वात नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा बाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघाला असून बाळासाहेबांच्या स्मारकाला ते मदत करतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करत नाहीच. आतातरी संघाने बहुजनांबद्दल द्वेषाची भूमिका बदलावी असेही गायकवाड यांनी म्हटले.
RSS ला इतक्या वर्षाने जाग का आली?; राऊतांचा सवाल
RSS ला इतक्या वर्षानंतर जाग का आली? हा संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली. संघाच्या दादर शाखेने दिलेल्या पत्रावर मुंबई महानगरपालिका याबाबत योग्य तो निर्णय घेईल असेही विनायक राऊत यांनी म्हटले. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे राज्यातील शिवसैनिकांचे भक्तिस्थान असल्याचेही राऊत यांनी यावेळी म्हटले.
राज ठाकरेंनी सुपारी घेतली; राऊतांचे टीकास्त्र
राज ठाकरे आता मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पाहून भाजपची तळी उचलत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. मुंबई महापालिका निवडणूक आल्यानंतर मनसे सुपारी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.