Rohit Patil : रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळणार
Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत करिष्मा घडवून आणलेल्या रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Rohit Patil : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत करिष्मा घडवून आणलेल्या रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये रोहित यांची राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झालीय. कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील नगरपंचायत निकालानंतर रोहित पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते.
नुकत्याच झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहित यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत या नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झालीच शिवाय राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढलंय.
अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत कवठेमंकाळ नगरपंचायत ची सत्ता एकहाती ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहितवर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून आता पाहिले जात आहे. आगामी विधानसभेत रोहित यांना विधानसभेचे तिकीट देऊन सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला रोखण्याची जबाबदारी दिली जाईल. रोहित पाटील यांना राजकीय बळ मिळावे, यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस युवकांच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी करण्यात आली आहे.
रोहित आगामी विधानसभेचा उमेदवार
23 वर्षांचे रोहित विधानसभेच्या आगामी निवडणूका ज्या वेळी होतील त्या वेळी ते 25 वर्षाचे होत आहेत. त्यामुळे आर.आर. यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्याऐवजी रोहित यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. ही समीकरणे लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच रोहित यांच्याकडे युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतेय.