(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी केला इतक्या कोटीचा विक्रमी दंड वसुल
अनेक क्षेत्रांमध्ये मंदी आणि सरकारी तिजोरी देखील खाली होताना दिसू लागली. अनेक सरकारी विभागांमध्ये होणारी उलाढाल देखील याच काळात थांबली. पण, रत्नागिरी वाहतूक विभागाने मात्र लॉकडाऊनच्या काळात वेगळा विक्रम केला आहे.
रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनची घोषणा झाली आणि सर्वच आघाडींवरची आर्थिक घडी विस्कटली. अनेक क्षेत्रांमध्ये मंदी आणि सरकारी तिजोरी देखील खाली होताना दिसू लागली. अनेक सरकारी विभागांमध्ये होणारी उलाढाल देखील याच काळात थांबली. पण, रत्नागिरी वाहतूक विभागाने मात्र लॉकडाऊनच्या काळात वेगळा विक्रम केला आहे. कारण, मागील दोन महिन्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 1 कोटींपेक्षा देखील जास्त दंड वसुल केला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर देखील अनेक वाहन चालक रस्त्यांवर फिरताना दिसत होते. वाहतूक विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा यांनी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील ही संख्या काही कमी होताना दिसत नव्हती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर थेट नियमांवर बोट ठेवत कारवाईचा बडगा उभारला गेला. हेल्मेट नसणे, सीट बेल्टशिवाय गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर, चुकीच्या बाजुने गाडी चालवणे, योग्य कागदपत्रे नसणे, गाडीचा विमा नसणे, फॅन्सी नंबर प्लेट असणे आदी कारणांसाठी ही कारवाई केली गेली. यावेळी हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांकडून तब्बल 65 लाख 77 हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान वसुल केलेली ही दंडाची रक्कम आजवरची कमी काळात वसुल केलेली सर्वाधिक रक्कम ठरली आहे.
दंड आकारल्यानंतर चित्र दिसू लागले वेगळे
लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये चलता है या वाक्यानुसार अनेक वाहने रस्त्यावर दिसत होती. पण, कारवाई सुरू झाल्याचे कळल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ही संख्या कमी कमी होताना दिसू लागली. वाहन चालक देखील योग्य कारणाशिवाय बाहेर पडणे टाळू लागले. शिवाय, बाहेर पडायचे झाल्यास सर्व गोष्टींची काळजी घेत नियमांचं भंग होणार नाही याची देखील काळजी घेऊ लागले. परिणामी रस्त्यावर दिसणारी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. तसेच सरकारी तिजोरीत देखील विक्रमी रक्कम जमी झाली. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात रस्त्यांवर वाहनांची संख्या जास्त होती. पण, दंड आकारणीला सुरूवात केल्यानंतर मात्र संख्या कमी होऊ लागली. परिणामी लॉकडाऊनच्या काळात नियमांचं पालन देखील झाले आणि रस्त्यावरची वर्दळ देखील कमी झाली. सध्या जिल्ह्या शिथिलता देण्यात आलेली आहे. पण, त्यानंतर देखील वाहन चालक नियमांचं पालन करताना दिसत आहे. अनेक वाहन चालक दंड भरण्यापेक्षा हेल्मेट विक घेत आहेत. ही बाब तशी सकारात्मक म्हणावी लागेल. कारण, यापूर्वी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण, आता मात्र त्यांच्याकडून नियम पाळले जात आहेत. शिवाय एक प्रकारची शिस्त देखील लागली आहे. ही बाब त्यांच्या दृष्टीने देखील चांगली असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
नियमांचे होते आहे पालन
आज घडीला वाहन चालकांकडून देखील कारवाईच्या भीतीने का असेना पण नियमांचे पालन होताना दिसत आहे. जवळपास 95 टक्क्यांपेक्षा अधिक चालक आपल्यावर दंडात्मक कारवाई होणार नाही याची काळजी घेतानाचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे.
संबंधित बातम्या :
- मुंबईत लॉकडाऊनमध्ये बनावट ई पास बनवणाऱ्याचं रॅकेट,एकाला अटक
- लॉकडाऊनमुळे कार बाजारातील स्थिरता दूर करण्यासाठी कंपन्यांच्या भन्नाट ऑफर्स!
- शेतात क्वारंटाईन असलेल्या मजुरांना उपसरपंचासह ग्रामस्थांकडून मारहाण