मुलीचा कॅन्सरने मृत्यू झाल्याच्या धक्क्याने वडिलांनी सोडले प्राण, रत्नागिरीतील घटना
जिवापाड जपलेल्या लाडक्या कन्येचा मृत्यू पाहिल्याचा धक्का नंदकुमार कदम यांना इतका बसला की, ते जागेवर खाली कोसळले. डॉक्टरांकडे उपचारासाठी त्यांनी नेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
रत्नगिरी : मुलीचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्या धक्क्याने वडिलांनी देखील प्राण सोडल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी येथे घडली आहे. त्यामुळे बाप-लेकीवर एकाच वेळ अंत्यसंस्कार करण्याची वेळ कदम कुटुंबियांवर आली. जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागात सहायक लेखाधिकारी म्हणून नंदकुमार लक्ष्मण कदम वय वर्षे वय 55 कार्यरत होते. शहरालगतचे बसणी हे त्यांचे मुळगाव आहे. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर घालाच घातला.
मोठी मुलगी प्राजक्ता वय वर्षे 28 हीचा कॅन्सरनं मृत्यू झाला. त्या धक्क्यानं वडिलांनी देखील आपले प्राण सोडले. प्राजक्ता हिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खासगी नोकरीला लागली होती. त्याचबरोबर तिचे लग्नही ठरलं होतं. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फारवेळ टिकला नाही. एका वर्षांपूर्वी प्राजक्ता अशीच एकदा आजारी पडली होती. तपासणी केली असता तिला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. या परिस्थितीतही न डगमगता प्राजक्तावर उपचार सुरू झाले. प्राजक्ता हळूहळू बरी होत होती.
मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. दोन दिवसांपूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नंदकुमार कदम यांनी तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यासाठी हालचाल सुरू केली. मात्र त्यांच्या हातावरच तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर झाला. जिवापाड जपलेल्या लाडक्या कन्येचा मृत्यू पाहिल्याचा धक्का नंदकुमार कदम यांना इतका बसला की, ते जागेवर खाली कोसळले. डॉक्टरांकडे उपचारासाठी त्यांनी नेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
Rural News | माझं गाव माझा जिल्हा | गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा | ABP Majha