...तर दानवेंचं डिपॉझिट जप्त होईल : बच्चू कडू
शेतकऱ्यांचं अस्तित्व आणि अस्मिता दाखविण्यासाठी मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
जालना : अपक्ष आमदार बच्चू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा खुलं आव्हान दिलं आहे. शेतकऱ्यांचं अस्तित्व आणि अस्मिता दाखविण्यासाठी मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
रावसाहेब दानवे आणि माझ्यात खानदानी शत्रुत्व नाही. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हटल्याचा मला राग आहे. त्यांनी शेतकऱ्यांना साले बोलून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
जर रावसाहेब दानवेंनी माझ्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल आणि लंगोट पण राहणार नाही, असं थेट आव्हान त्यांनी दानवेंना दिलं. प्रहार संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त बच्चू कडू जालना दौऱ्यावर आहेत, त्याठिकाणी ते बोलत होते.
त्यामुळे दानवेंनी शेतकऱ्यांना 'साले' म्हंटलं होतं, त्यावरच निवडणूक जिंकून येण्याचा निश्चय बच्चू कडू यांनी केला असल्याचं दिसून येत आहे.
दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असंही बच्चू कडू काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. गेल्या महिन्यातच जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीला बच्चू कडू यांनी सुरुवात केली आहे.