(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rana vs Shivsena : शिवसैनिकांनीच घरावर हल्ला केला; CCTV च्या आधारे राणा कुटुंबियांचा दावा
Rana vs Shivsena : अमरावतीमधील घरावर शिवसैनिकांनी दगडफेक केली असल्याचे सांगत राणा कुटुंबियांनी सीसीटीव्ही फूटेज समोर आणले आहे.
Rana vs Shivsena : अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या घरावर शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप राणा परिवारानं केला होता. आता या प्रकरणाचं आता एक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. या फूटेजमध्ये राणांच्या घरावर दगड मारणारा व्यक्ती शिवसैनिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. शनिवारी मुंबईत आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा पठणासाठी जाणार होते. त्यावेळी शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या अमरावतीमधील घरासमोर निदर्शने केली होती.
आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाकडून शनिवारी शिवसैनिकांनी घरावर दगड मारत असतानाचा CCTV चा व्हिडीओ दिला. ज्यामध्ये दगडफेक करतांना स्पष्ट एक व्यक्ती दिसत आहे. शनिवारी 23 एप्रिल रोजी आमदारा रवी राणा यांनी माझ्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी दगडफेक झाली नसल्याचे म्हटले होते.
अमरावती येथील शंकर नगर मध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे निवासस्थान आहे. राणा दाम्पत्याने अमरावती पोलिसांना चकवा देत मुंबई गाठली होती. मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतरही मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मुंबईसह अमरावतीतही शिवसैनिक आक्रमक झाले होते. अमरावतीमधील शिवसैनिकांनी राणा यांच्या घरासमोर लावलेले बॅरिकेटस खाली फेकून आत घुसण्याचं प्रयत्न ही केला होता.
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानंतरच सुनावणी घेण्याची तारीख ठरवू, असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा 29 तारखेपर्यंत मुक्काम कारागृहातच असणार आहे.