कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या 'ठाकरे' सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही : रामदास आठवले
राज्यात आणि मुंबईत कोरोनाशी सामना करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना विश्वासात घेत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारण खेळत राहिले, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई : महारष्ट्रात कोरोना व्हायरस या महामारीला अस्थिर करण्याऐवजी स्थिर करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर झाले आहे. राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या आणि कोरोनाला रोखण्यात स्पष्ट अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली आहे.
कोणतेही नैसर्गिक मोठे संकट राज्यवार आले असताना सर्व राज्याने एकजूटीने संकटाचा मुकाबला करायचा असतो. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्र बैठक घेऊन त्यांना विशेषतः विरोधी पक्षाला ही विश्वासात घ्यायचे असते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यास राज्यातील विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही.
कोरोनाच्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रीयस्तरावर लॉकडाऊनवर टीका करत आहेत. लॉकडाऊनमुळे देशात लाखोंचे प्राण वाचले आहेत. कोरोनाची साथ रोखण्यात लॉकडाऊन उपयोगी ठरत आहे. त्यामुळे लॉकडाऊनवर टीका करण्याचे राहुल गांधींचे राजकारण निषेधार्ह आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
देशात सर्व राज्यांनी कोरोना रोखण्यात यश मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र्र सरकारला यात यश मिळाले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारण खेळत राहिले. राज्यात कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला राज्यात सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
CM Thackeray मुख्यमंत्र्यांची वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र संपादकांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?