Ram Navami 2022 LIVE : रामनवमीचा सर्वत्र उत्साह, पंतप्रधान मोदींनी दिल्या खास शुभेच्छा, वाचा प्रत्येक अपडेट्स
Ram Navami 2022 : आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. राम नवमीसंदर्भात सर्व अपडेट्स एका क्लिकवर....
LIVE
Background
Ram Navami 2022 : आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी 12 वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्यांना करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वाहताना. आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
राम नवमी 2022 चा शुभ मुहूर्त :
राम नवमी तारीख - 10 एप्रिल 2022, रविवार
नवमी तिथी सुरू - 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा 1:32 मिनिटांपासून सुरू
नवमी तिथी समाप्त - 11 एप्रिल रोजी पहाटे 03:15 पर्यंत
पूजेचा मुहूर्त - 10 एप्रिल सकाळी 11:10 ते 01:32 मिनिटे
राम नवमीसाठी लागणारी हवन सामग्री
आंब्याचं लाकूड, आंब्याची पानं, पिंपळाचं पान, बेल, लिंबाची पानं, ,बेल, नीम, उंबराची साल, चंदनाचं लाकूड, अश्वगंधा, गुळवेलची मुळी, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचं तूप, विलायची, साखर, नवग्रहाचं लाकूड, पंचामृत, नारळ, जवस
राम नवमी पूजा पद्धत :
रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची विधिपूर्वक पूजा करावी. पूजेपूर्वी त्यांना कुंकुम, सिंदूर, रोळी, चंदन इत्यादींनी तिलक करावं आणि बांधावर तांदूळ आणि तुळस अर्पण करावी. रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांना तुळशी अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्री रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पठण करावे. श्री राम, लक्ष्मणजी आणि माता सीता यांना झुलवल्यानंतर त्यांची आरती करा आणि भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप करावा.
Disclaimer: ही माहिती केवळ पौराणिक माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Important days in 9th April : 9 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
- Important days in 8th April : 8 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
Jalgaon : राम नवमीच्या शोभा यात्रेत गिरीश महाजनांचा ठेका
Jalgaon : राम नवमीच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यात भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठ्या उत्साहात नाच केल्याचं पाहायला मिळाले आहे.
गिरीश महाजन हे नेहमीच त्यांच्या अनोख्या नृत्य शैलीने अख्या महाराष्ट्राला परिचित आहेत. कोणताही आनंदाचा क्षण मिळाला की गिरीश महाजन यांना नाच करण्याचा मोह आवरत नसल्याचं नेहमीच पाहायला मिळालं आहे.
आज श्रीराम जन्मोत्सव समिती, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे निर्बंध असल्याने राम नवमी साजरी करताना अनेक मर्यादा होत्या. यंदा मात्र कोरोनाचे सर्वच निर्बंध हटविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यानी त्यांना नाचण्याचा आग्रह केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभे राहून गिरीश महाजन भेभान होऊन नाचले.
Solapur : सोलापुरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या यात्रेदरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यात वादावादी
Solapur : सोलापुरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या यात्रेदरम्यान कोंतम चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यात वादावादी झाली आहे. पोलिसांनी मिरवणूक मार्गात अचानक बदल केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी यात्रा मार्गात काही बदल केला. हजारो युवक कोंतम चौकात जमा झाल्याने काही मिनिटं तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.
Yavatmal : रामनवमीच्या शोभरात्रेत केरळच्या पारंपारिक वाद्यांने वेधले यवतमाळ करांचे लक्ष
Yavatmal : रामनवमीनिमित्त यवतमाळ शहर राममय झाले असून हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी केरळच्या 23 कलाकारांचे वाद्य आणि देवीदेवतांच्या कलाकृतीने यवतमाळकरांचे लक्ष वेधले.
ठिकठिकाणी यवतमाळकरांनी या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. जय हिंद चौकातून आकर्षक रथावर श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार मदन येरावार यांच्यासह रामभक्तांनी हाताने हा रथ ओढला. शहरातले सुप्रसिद्ध ढोलपथक, शंभरहून अधिक झांकी, चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री रामनवमी शोभायात्रा समितीने या निमित्त शहरात रामधून वाजविली. ठिकठिकाणी भजन व गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
राम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने ही शोभायात्रा काढली.
Kalyan : श्रीराम नवमीनिमित्त कल्याण येथे भाजपतर्फे भव्य शोभायात्रा
Kalyan : शोभयात्रेच्या माध्यामातून कल्याण येथे आज भाजपतर्फे श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भव्य प्रतिकृती तसेच श्रीरामाच्या, हनुमंताच्या वेशातील बच्चे कंपनी या शोभायात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.
कल्याण येथे प्रथमच या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेच्या सुंदरनगर येथून ही शोभायात्रा सुरू होऊन आग्रा रोड, बेतुरकर पाडा, श्रीराम मंदिर, सहजानंद चौक, संतोषी माता रोडमार्गे यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे समाप्त झाली. यावेळी भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान जय श्रीरामच्या घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दणाणून गेल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येेथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येेथे राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मालेगाव कॅम्प भागातील बालाजी मंदिरा जवळून मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी आयोध्येतील नियोजित राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. कृषिमंत्री दादा भुसे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते महाआरती करून मिरवणूक संपन्न झाली.