राज्यसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद, राष्ट्रवादीची एक जागा देण्याची काँग्रेसची मागणी
राज्यसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यसभेतील राष्ट्रवादीची एक जागा देण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मात्र राष्ट्रवादीचा त्यासाठी विरोध आहे.
मुंबई : राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु झाल्यांची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यसभेची राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा द्यावी अशी मागणी काँग्रेसची आहे. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम खाती मिळाल्याने राज्यसभेची एक जागा मिळावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर असलेल्या माजिद मेमन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना उमेदवारी मिळणं निश्चित मानलं जातं आहे. मात्र काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांना राज्यसभेची जागा देण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. चतुर्वेदींना राज्यसभेची जागा मिळावी या मागणीसाठी राज्यातील नेत्यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांची भेट घेतली.
राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक; कुणाची वर्णी लागणार, कुणाला डावललं जाणार?
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर 7 पैकी 4 खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे यात राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी होऊ शकते. चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने चौथ्या जागेसाठी फौजिया खान यांना उमेदवारी द्यायचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच आता चौथ्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
राज्यसभेसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. उद्या (6 मार्च) निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 13 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
उदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय? राज्यसभेच्या उमेदवारीवरुन संजय काकडेंचा सवाल
यंदा जे सात सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. मात्र उरलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला नव्याने संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.