Sanjay Raut : शिवसेनेकडून चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार संजय राऊत, नावावर जमा होणार 'हा' विक्रम
Rajya Sabha Election : शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाकडून सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणं ही सोपी गोष्टी नाही. धारदार लेखणी आणि आक्रमक वाणीच्या जोरदार संजय राऊत यांनी शिवसेनेत आपलं स्थान निर्माण केलंय.
मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या उमदेवाराचं नाव अद्याप जाहीर नसलं तरी पहिला उमेदवार म्हणून संजय राऊत यांचं नाव निश्चित आहे. 26 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील. त्यांच्या सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्यानं एक नवा विक्रमही नोंदवला जाणार आहे.
शिवसेनेची ही तोफ महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रोज धडाडत असतेच. पण याच तोफेवर विश्वास ठेवत शिवसेना ती पुन्हा राज्यसभेतही पाठवणार आहे. खासदार संजय राऊत हे शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवार असणार आहेत. 26 मे रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. निवडणूक जिंकल्यानंतर सलग चौथ्यांदा शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्याचा विक्रमही राऊत प्रस्थापित करतील.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रम याआधी सरोज खापर्डे यांच्या नावावर आहे. 1972 ते 2000 तब्बल 28 वर्षे त्या काँग्रेस पक्षाकडून खासदार होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या त्या निकटवर्तीय होत्या. केंद्रात एकदा आरोग्य राज्यमंत्रीपदही त्यांनी सांभाळलंय. संजय राऊत यांची चौथ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ते या विक्रमाच्या अगदी जवळ जातील.
शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात उद्योगपती मुकेश पटेल, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, संजय निरुपम यासारख्या अनेकांना राज्यसभेवर पाठवलं. पण संजय राऊत 2004 पासून सलग चौथ्यांदा शिवसेनेकडून राज्यसभेवर जाणारे पहिले उमेदवार ठरतील. 2004 ला पहिल्यांदा राज्यसभा मिळाली तेव्हा त्यांचं वय होतं 43.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सर्वाधिक वेळा जाणारे खासदार
- महाराष्ट्रातून 5 वेळा राज्यसभेवर जाण्याचा विक्रम काँग्रेसच्या सरोज खापर्डे यांच्या नावावर आहे.
- नजमा हेपतुल्ला एकूण सहा वेळा राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यातल्या पहिल्या चार टर्म त्या महाराष्ट्रातून निवडून गेल्या. नंतर मध्यप्रदेश, राजस्थानमधून त्यांची
- निवड झाली. शिवाय पहिल्या चार टर्म काँग्रेसकडून आणि शेवटच्या दोन टर्म त्या भाजपकडून खासदार होत्या.
- काँग्रेसचे एनकेपी साळवे हे देखील 1978 ते 2002 असे सलग चार टर्म राज्यसभा खासदार.
- सुरेश कलमाडी, प्रमोद महाजन या नेत्यांनाही चार टर्म राज्यसभा मिळाली, पण कधीमधी लोकसभाही ते लढवत राहिले.
सहा-सात वेळा राज्यसभेवर जाणारे काही मोजके खासदार देशात आहेतही. पण ते राष्ट्रीय पक्षांकडून. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाकडून सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणं ही काही सोपी गोष्टी नाही. धारदार लेखणी आणि आक्रमक वाणीच्या जोरदार संजय राऊत यांनी शिवसेनेत आपलं स्थान निर्माण केलंय. सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार अशा दोन्ही जबाबदाऱ्या ते सांभाळत आलेत.
राज्यसभेच्या तीन टर्ममधली संजय राऊत यांची कामगिरी,
- 137 चर्चांमध्ये सहभाग.
- राज्यसभेतली उपस्थिती 70 टक्के.
- 2163 तारांकित, अतारांकित प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
- खासगी विधेयक मात्र एकही मांडलेले नाहीय.
शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचा दिल्लीतला चेहरा म्हणूनही संजय राऊत आता ओळखले जाऊ लागलेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्र आणण्यातही ते महत्वाचा दुवा ठरले होते. चौथ्यांदा निवड झाल्यानंतर राज्यसभेत ते महाराष्ट्राचे प्रश्न किती आक्रमकपणे मांडतात आणि आपल्या पक्षासाठीही काय राष्ट्रीय भूमिका बजावतात हे पाहणं महत्वाचं असेल.