'आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरु', कवितेच्या माध्यमातून राजू शेट्टींनी व्यक्त केल्या भावना
निवडणुकीत पराभव झाला तरी शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष सुरु राहील, अशा भावना राजू शेट्टी यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं आहे. तसेच पराभवाने आपण खचलो असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. मात्र पराभवानंतर खचून न जाता संघर्ष करणार असल्याचं राजू शेट्टींचं ठरलं आहे. आपल्या भावना राजू शेट्टींना कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी हे महायुतीत सहभागी होते. मात्र यंदा त्यांनी महाआघाडीसोबत हातमिळवणी करत लोकसभेची निवडणूक लढवली. निवडणुकीच्या निकालाने थोडा खचलो आहे. मात्र निवडणुकीत पराभव झाला तरी शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष सुरु राहील, असं त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं आहे.
आजपासून...
मी संत नाही शांत आहे गोतावळ्यातून दुरावलो याची मनात खंत आहे कट करून गाडलेल्या बळीचा मी पुत्र आहे " ज्याला फळं... त्यालाच दगडं..." हे जगाचं सूत्र आहे..
मी खचलो नाही थोडासा टिचलो आहे... ते कोण मला बेदखल करणार ? मी बळीराजाच्या काळजातच घर करून बसलो आहे...
म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा नवा एल्गार करू... गोरगरिबांच्या हक्कासाठी आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू...!! - राजू शेट्टी