या आधीही एकत्र दिसले, पण मनोमिलन नाही, आता 'मराठी'मुळे ते साध्य होणार का? ठाकरे बंधूंच्या भेटीचा फ्लॅशबॅक
MNS Shiv Sena Alliance : राज आणि उद्धव हे दोन ठाकरे या आधीही अनेकदा एकत्र दिसले आहेत. राजकीय पटलावर मात्र ते कधीच एकत्र आले नाहीत. यावेळी मराठीच्या मुद्द्यावर ते शक्य होईल का याकडे सर्वाचं लक्ष आहे.

मुंबई : सध्या महाराष्ट्राचं खासकरून मुंबईकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का? हिंदीविरोधाचा धाग्यानं ठाकरे बंधूंना एकत्र आणलं. 5 तारखेच्या मेळाव्यात या एकीचा आवाज महाराष्ट्रात घुमणार आहे. त्यानंतरही या बंधूंच्या एकीची वज्रमूठ टिकणार का, हा प्रश्न विचारला जातोय. 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र दिसणार असले तरी 2006 मध्ये ताटातूट झाल्यापासून ते अनेकदा एकत्र आलेत. पण मनोमिलन मात्र झालं नाही.
मार्च 2006
शिवसेनेत दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. ज्यांच्या सावलीत वाढले त्या बाळासाहेबांची साथ सोडली. ज्यांच्यासोबत बालपण घालवलं त्या उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली.
जून 2025
आता तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची शक्ती मुंबईतल्या रस्त्यावर दिसण्याआधीच फडणवीस सरकारनं त्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येणार आहेत ते विजयी मेळाव्याच्या निमित्तानं.
5 तारखेच्या मेळाव्यानंतर राजकारणातही ठाकरे बंधू हातात हात घालून चालतील का या प्रश्नाचं उत्तर आताच देता येत नाही. पण 2006 नंतर एकमेकांशी राजकीय फारकत घेतल्यानंतर ठाकरे बंधू या ना त्या कारणानं एकत्र आलेले आहेत. कधी सार्वजनिक कार्यक्रमात, तर कधी घरगुती समारंभात. 2006 मध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र दिसले ते बाळासाहेबांचं निधन होण्याच्या काही महिने आधी. रण होतं उद्धव ठाकरेंचं आजारपण.
17 जुलै 2012
छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अलिबागमध्ये मनसेच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या राज ठाकरेंच्या कानावर ही बातमी गेली णि पक्षाचा कार्यक्रम अर्धवट सोडून राज ठाकरेंनी तातडीनं लीलावती हॉस्पिटलकडे धाव घेतली. यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि आईसुद्धा होत्या.
इतकंच नाही तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी स्वत: कार चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर नेलं. बाळासाहेब हयात असतानाच घडलेल्या या घटनेकडे दोघा भावांच्या राजकीय मनोमिलनाची नांदी म्हणून पाहिलं गेलं. ण तसं काही झालं नाही.
17 नोव्हेंबर 2012
त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाळासाहेबांचं निधन झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसले.
10 जानेवारी 2015
2014 ची निवडणूक आली आणि गेली. पण ठाकरे बंधूंमधला राजकीय दुरावा कायम राहिला. पण एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच फ्रेममध्ये दिसले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. त्यासाठी राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले. इतकंच नाही, तर उद्धव हा उत्तम फोटोग्राफर आहे. त्याची कला मी लहानपणापासून पाहात आलो आहे असं कौतुकही राज ठाकरेंनी केलं.
त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला. यावेळी निमित्त होतं, शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचं.
12 डिसेंबर 2015
शरद पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सर्वपक्षीय दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली. राज ठाकरेंनी थोडा पॉझ घेतला आणि बंधूराज आले असं म्हणत आपल्या शैलीत खास टिप्पणी केली.
27 जानेवारी 2019
राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा मुंबईतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडला. ठाकरेंच्या नेक्स्ट जनरेशनमधला हा पहिलाच विवाह सोहळा होता. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य यांच्यासह विवाह सोहळ्याला हजर राहिले. पण वधू-वरांना आशीर्वाद देऊन अवघ्या अर्ध्या तासात ते निघूनही गेले.
त्याच वर्षाअखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत न भूतो न भविष्यती सत्तानाट्य झालं. भाजप आणि शिवसेनेतली युती फिस्कटली आणि एका नव्याच आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच्या त्या सरकारचे प्रमुख होते, उद्धव ठाकरे.
28 नोव्हेंबर 2019
ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार होती. शिवसेना आणि ठाकरेंसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण होता. उद्धव ठाकरेंचं निमंत्रण स्वीकारून राज ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. पण त्यानंतर मात्र राज ठाकरेंनी हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली. भोंगे आणि मंदिरांच्या मुद्द्यावरून मनसेनं ठाकरे सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. याच काळात ठाकरे बंधूंमधला राजकीय वाद शिगेला पोहोचला.
23 जानेवारी 2021
असं असूनही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जन्मदिनाचं निमित्त साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं. कुलाब्यातल्या शामाप्रसाद मुखर्जी चौकात अनावरण करण्यात आलं. यावेळी पक्षभेद विसरून राज्यातले प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेही या सोहळ्याला हजर राहिले.
अगदी अलीकडंच दोन घरगुती समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकाच फ्रेममध्ये दिसले.
22 डिसेंबर 2024
राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचं लग्न दादरमधल्या राजा शिवाजी विद्यालयात पार पडलं. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या शेजारी उभं राहून वधूवरांना आशीर्वाद दिला.
24 फेब्रुवारी 2025
त्यानंतर दोनच महिन्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले. अंधेरीत झालेल्या या लग्नात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हास्यविनोदही रंगला. या भेटीची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा झाली. पण ठाकरे बंधू राजकारणात एकत्र येण्याची चर्चा तोपर्यंत थंडावली होती.
एप्रिल महिन्यात राज ठाकरेंच्या एका मुलाखतीतल्या एका विधानानं दोघा बंधूंच्या युतीच्या चर्चेला वेग आला. महाराष्ट्रासाठी जुने वाद विसरण्याची तयारी दोन्ही बंधूंनी दाखवली आणि हिंदीच्या मुद्द्यानं ती संधी चालूनही आली. तब्बल 19 वर्षांनी ठाकरे बंधूमध्ये हिंदीवरून मनोमिलन झालं आहे. पण 5जुलैच्या सभेनंतरही ते कायम राहणार का, हेच पाहण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे.
ही बातमी वाचा:
























