(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंच्या हाताला दुखापत, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. आज सकाळीच ते रुग्णालयात जाऊन आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हाताला सोमवारी रात्री टेनिस खेळताना दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं आहे. आज सकाळीच ते रुग्णालयात जाऊन आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होते.
या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभरातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला देखील पक्षप्रमुख राज ठाकरे सकाळी 11च्या सुमारास उपस्थित राहिले होते. यावेळी जवळपास 45 मिनिटं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं. परंतु हात दुखत असल्यामुळे ते जास्त वेळ कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना पुढील दीड महिनाभर हाताला प्लास्टर ठेवण्यासाठी सांगितलं आहे. परंतु राज ठाकरे आगामी निवडणुकींच्या तयारीसाठी पुढील काही दिवस कृष्णकुंजवर राज ठाकरे आढावा बैठक घेत राहणार आहेत. त्याच बरोबर काही दिवसांनंतर राज ठाकरे या महानगरपालिका क्षेत्रात त्यांचा गोवा ही करतील असं पक्षाच्या नेत्यांची सांगितले आहे.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे दररोज सायंकाळी शिवाजी पार्क येथील टेनिस क्लबमध्ये टेनिस खेळण्यासाठी येत असतात. त्यावेळी त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी त्यांनी आदित्य नावाच्या एका कोचची देखील नियुक्ती केल्याची माहिती आहे. दररोज संध्याकाळी शिवजीपार्क येथील जिमखाना येथे तास दोन तास टेनिस खेळणे, पहाटे साडे पाच वाजता लवकर उठून एक तास योगासने करणे. त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणे असे उपाय दररोज राज ठाकरे करत असल्याची माहिती आहे. यासोबतच वजन कमी करण्यासाठी त्यांनी संकेत कुलकर्णी नावाच्या एका प्रशिक्षकाची देखील नेमणूक केली असून संकेत हे राज ठाकरे यांना वजन कमी करण्यासाठीचा डायट कसा असावा याबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी आठवडयातील काही वार देखील ठरवून घेतले आहेत. मागील जवळपास एक वर्षांपासून राज ठाकरे यांनी टेनिस खेळणं सुरू केलं आहे. याचा चांगलाच फायदा राज ठाकरे यांना होतं असल्याची देखील माहिती आहे. यासोबतच राज ठाकरेंनी घरीच जीम तयार केली असून दररोज व्यायाम करून घेण्यासाठी एका ट्रेनरची देखील नेमणूक केली आहे. दररोज सकाळी योगासने करणे, जीम मध्ये व्यायाम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे यासोबतच ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी ते पोहण्याचा देखील आनंद घेतं असतात, असे उपाय राज ठाकरे यांनी सुरू केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाची जबाबदारी घेण्याआधी राज ठाकरे नेहमी आपल्या शिवाजी पार्क येथील घरासमोर गल्लीत क्रिकेट खेळत होते. परंतु पक्षाची जबाबदारी खांद्यांवर घेतल्यानंतर त्यांचं क्रिकेट खेळणं पूर्णपणे बंद झालं आहे. परंतु मागील एक वर्षांपासून त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केलीय. मध्यंतरीच्या कालावधीत राज ठाकरे सकाळी गर्दी कमी असताना शिवजीपार्क ते माहीम सिटीलाईट जवळ असणाऱ्या रेगीस जीम पर्यत सायकलिंग देखील नियमीत करत होते. त्यानंतर जीम मध्ये व्यायाम करायचे परंतु नंतरच्या काळात गर्दीचा त्रास होऊ लागल्यामुळे राज ठाकरे यांनी घरी जीम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे आणि पहाटे साडेपाच ते साडेसहा एक तास योगासने करणे यावर भर दिला आहे. एकंदरीत राज ठाकरेंच्या या नित्यनियमाचा चांगलाच फायदा त्यांना झाला असल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या :