कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गात पावसाची जोरदार हजेरी
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस झाल्याचा अंदाज आहे. पुढचे 48 तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबई : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार सरी बरसल्या आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस झाल्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात, सांगलीच्या खानापूर, आटपाडीत पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, मालवण या भागातही पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला आहे.
भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सांगलीतील पूर्वेकडील खानापूर, आटपाडी, कडेगाव पलूस या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर कवठे महाकाळ तालुक्यात संततधार सुरू आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काही भागातील ऊस तोडी देखील थांबल्या आहेत.
पुढचे 48 तास मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. तसेच सद्यस्थितीत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना त्वरित नजीकच्या बंदरात येण्याच्या सूचना हवामान व मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आल्या आहेत.