VIDEO Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी, छत्रपतींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं केलं स्पष्ट
Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराजांनी साम, दाम, दंड, भेद नीती वापरून काम केलं. त्यासंदर्भात बोलताना त्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू आपल्या मनात नव्हता असं अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याविषयी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तसा विचार कधीही मनात येणार नाही असं ते म्हणाले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केलं होतं. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
राहुल सोलापूरकर म्हणाले की, दीड दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली. त्या दरम्यान, इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी वक्तव्य केलं. तसा संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखतीमधील ते दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही येणार नाही.
त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल सोलापूरकर म्हणाले. साम, दाम, दंड, भेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करत आहेत. 'राजर्षी शाहू' मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती. पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाचा पिक्चर सुरू झाला.
Rahul Solapurkar Statement On Shivaji Maharaj : काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?
"छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो."
ही बातमी वाचा:























