तंबाखू खावून रस्त्यावर थुंकणे तरुणाला महागात, रस्ता धुण्याची शिक्षा
सिंधुदुर्गात तंबाखू खावून रस्त्यावर थुंकणाऱ्या तरुणावर रस्ता धुण्याची वेळ आली. शिवाय दंडात्मवाईही झाली. मालवण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. त्यासाठी सगळीकडे विशेष लक्षही दिलं जात आहे. अशात सिंधुदुर्गातील मालवणमध्ये तंबाखू खावून रस्त्यावर थुंकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. थुंकलेला रस्त्याचा भाग पाण्याने धुऊन काढण्याची शिक्षा या तरुणाला देण्यात आली. शिवाय दंडात्मक कारवाईला या तरुणाला सामोरे जावं लागलं. मालवण पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी ही कारवाई केली.
मालवण देऊळवाडा येथील पोलीस तपासणी नाक्याजवळ हा सगळा प्रकार घडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरात सध्या या पार्श्वभूमीवर कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज देऊळवाडा भागात पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे गस्त घालत होते. या दरम्यान तेथे आलेल्या एका मोटारीतील एक तरुण रस्त्यावर तंबाखू खावून थुंकला. हा प्रकार लक्षात येताच मुख्याधिकाऱ्यांनी ती गाडी थांबवून त्या तरुणाला रस्त्यावर ज्या ठिकाणी थुंकला तो भाग पाण्याने धुण्यास सांगितला आणि तो धुवूनही घेतला. त्यानंतर त्याच्यावर 150 रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात असून केलेल्या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान, यापुढे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खावून थुंकल्यास प्रशासनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
संबंधित बातम्या
- संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
- झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी
- कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना
Nirmala Sitharaman | संरक्षण उत्पादन क्षेत्रातील एफडीआय मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्के -अर्थमंत्री निर्मला सीतारमण