pune Crime News : चुकीला माफी नाहीच! तिरंगा भिरकवणाऱ्या गायिकेला अखेर माफी मागावी लागली, नक्की काय म्हणाली?
पुण्यातील क्लबमध्ये गायिकेने नाचता नाचता थेट तिरंगा भिरकावल्यानंतर थेट पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तिच्यावर कारवाई केली. या प्रकरणामुळे आता या गायिकेने इंस्टाग्रामवरुन माफी मागितली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुण्यात (Pune Crime News) तिरंग्याचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यात म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावला होता. पुण्यातील क्लबमध्ये गायिकेने नाचता नाचता थेट तिरंगा भिरकावल्यानंतर थेट पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तिच्यावर कारवाई केली. या प्रकरणामुळे आता या गायिकेने इंस्टाग्रावरुन माफी मागितली आहे.
गायिका उमा शांती उर्फ शांती पीपल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टेजवर डान्स करत असताना दोन्ही हातात तिरंगा घेऊन प्रेक्षकात फेकल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहे. त्यानंतर हातवारे करून असभ्य वर्तन केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचा भंग करून अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इंस्टाग्रामवर शांती पीपल नावाच्या पेजवर स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे. त्यात ती म्हणते की, कालचा शो प्रचंड भारी झाला. सगळ्या पुणेकरांचं मनापासून धन्यवाद. मला माझ्या कॉन्सर्टमध्ये कोणतंही वाईट कृत्य करायचं नव्हतं. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनावधानाने मी भारताचा तिरंगा फिरकवला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठा गोंधळ झाला. मला देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. मात्र मला असा भारताच्या राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारचा अवमान करायचा नव्हता. या कृत्यासाठी मी सगळ्यांची माफी मागते. माझं भारतावर प्रचंड प्रेम आहे. स्वातंत्र्य दिनाचा अर्थ मला माहिती आहे. मात्र माझ्याकडून जो प्रकार घडला त्यासाठी मी प्रत्येक भारतीयांची माफी मागते.
स्वातंत्र्या दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडला होता. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी या गायिकेला शिवीगाळ केली होती. भारतात येऊन राष्ट्रध्वजाचा अवमान खपवून घेणार नाही, गायिकेला अटक करा, तिच्यावर कारवाई करा, तिच्यावर गुन्हे दाखल करा, भारतात काहीही खपवून घेणार नाही, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. तर अनेकांनी संतापही व्यक्त केला होता.
कोंढव्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
त्याच दिवशी पुण्यातील कोंढवा परिसरात दोन तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं होतं. याच भागातील नागरिकांनी या घोषणा ऐकल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी घोषणा देणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यात संतापाची लाट उसळली होती.