गुरु-शिष्यांचं नातं अतूट करणारा पुण्यातील प्रसंग, ओढ्याच्या पुरातून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका
Pune Rains : गुरुंनी त्यांच्या शिष्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाट काढून दिली. मानवी साखळी (Human Chain) करुन सत्तरहून अधिक विध्यार्थ्यांना त्यांच्या पालकाकंडे सुपूर्द केलं आहे.
Pune Rains : गुरुपौर्णिमेच्या (Guru Purnima) पूर्वसंध्येला गुरु शिष्याच नातं अतूट करणारा प्रसंग पुणे जिल्ह्याच्या मावळमध्ये (Maval) घडला आहे. गुरुंनी त्यांच्या शिष्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाट काढून दिली. मानवी साखळी (Human Chain) करुन सत्तरहून अधिक विध्यार्थ्यांना त्यांच्या पालकाकंडे सुपूर्द केलं आहे. पाण्याच्या प्रवाहातून सुटका होताच विद्यार्थी आणि पालकांनी सर्व गुरुंचे आभार मानले.
मावळच्या भडवली येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे हे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. गावातील मार्गांवर असणाऱ्या ओढ्याला कालच्या पावसाने पूर आला. आजूबाजूच्या शेतातून ही मार्गांवर प्रचंड पाणी वाहू लागले. सकाळी शाळेत येताना असणारी परिस्थिती बारा वाजेपर्यंत बदलली. तेव्हा ओढ्यावरुन गुडघाभर पाणी वाहू लागले होते. अशा परिस्थितीत ओढ्या पलीकडे जायचं म्हणजे जीवाला धोका पत्करण्यासारखं होत. त्यामुळे ओढ्या पलीकडच्या गावातील जवळपास सत्तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होत. शेवटी शाळेला सुट्टी देण्यात आली. सर्व शिक्षक सोबतीने आले आणि मग मानवी साखळी करुन, ओढ्याच्या पुरातून सुटका करायचं ठरलं.
भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एकमेकांचे हात धरायला सांगितले अन् त्या पाण्यातून वाट काढायला सुरुवात झाली. तेव्हाच सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दुतर्फा भिंतीप्रमाणे उभे ठाकले. हळूहळू या बिकट प्रसंगातून विद्यार्थी बाहेर पडू लागले, तसंतसं त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागलं. अशाप्रकारे ता पाण्याच्या प्रवाहाचा सामना करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पालकामंकडे सुखरुप सुपूर्द केलं. त्यामुळे पालकांनी ही सर्व शिक्षकांचे आभार मानले. योगायोगाने हा प्रसंग गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला घडला. यानिमित्ताने गुरु आणि शिष्यांचं नातं अतूट का असतं हे अधोरेखित झालं.
पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे खडकवासला धरणात क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही हलक्या व मध्यम स्वरूपात पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला. लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत.