Pune supriya sule : शिरूर लोकसभा महाविकास आघाडी लढणार आणि जिंकणार; खा. सुप्रिया सुळे यांचा विश्वास
शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक लोक इच्छुक आहेत, ही चांगली बाब असून शिरुर लोकसभा राष्ट्रवादी लढवणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
Pune supriya sule : मागील काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघाची चर्चा राज्यात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्याच विलास लांडे यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक लोक इच्छुक आहेत, ही चांगली बाब आहे. शिरुर लोकसभा राष्ट्रवादी लढवणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात इच्छुकांचं मी स्वागत करते. महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार शिरुर लोकसभेसाठी इच्छुक आहेत. ज्या ठिकाणी यश दिसतं त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार उमेदवार असतात. त्यामुळे येत्या 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच जिंकणार आहे. लोकशाही आहे. या लोकशाहीत एखाद्याने उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली तर त्यात काहीही गैर नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुण्यातील फ्लेक्सबाजीची चर्चा राज्यभर रंगते. राष्ट्रवादीचे विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चेला उधाण आली. अमोल कोल्हे लोकसभा निवडणूक लढणार का? अशी चर्चा सुरु असतानाच विलास लांडे यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार इच्छुक असल्याने राष्ट्रवादीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
विलास लांडेंनी ठोकला शिरुर लोकसभेवर दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असून 2009 पासूनच माझा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विलास लांडे आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अडचण ठरण्याची शक्यता आहे. 2019ला लांडे यांची पूर्ण तयारी झाली होती, तेव्हा ऐनवेळी कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मतदारसंघात भावी खासदार अशी फ्लेक्सबाजीदेखील केली होती.
कोल्हे की लांडे?
विलास लांडे यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा ठोकल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी लांडे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासोबतच शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही असं म्हणत त्यांनीदेखील शिरुर लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून किंवा राष्ट्रवादीकडून शिरुरमध्ये उमेदवारी लांडेंना मिळते की कोल्हेंना मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.