Pune News : पुन्हा कोयता हल्ल्यानं पुणं हादरलं; MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं वार; टिळक रोडवर हल्ल्याचा थरार
Pune News: पुण्यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज पहाटे ही घटना घडली आहे.

Pune Crime News: पुणे : पुण्यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार आणि त्याचे मित्र पुण्यातील सदाशिव पेठेतील अभ्यासिकेतून घरी जात असताना शक्ती स्पोर्टच्या समोर तीन जण दुचाकीवरुन आले आणि या मुलांना अडवलं आणि शर्टाची कॉलर पकडून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार रात्री दोन वाजता घडला. हल्ला करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या हल्लेखोराचं वय 25 ते 26 दरम्यान आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली.
कोयता हल्ले आणि मारहाण कधी थांबणार?
दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या चाकणमध्ये तीन अज्ञात तरुणांनी हॉटेलमध्ये बसलेल्या पाच ते सहा जणांना लाकडी दांडके आणि पाईपने बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची चैन हिसकावली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. श्रीराम संतोष होले, प्रतीक उर्फ बंटी दत्तात्रय टाळकर आणि बबलू रमेश टोपे या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी सतीश गव्हाणे हे त्यांच्या काही मित्रांसह हॉटेलच्या समोर बसले होते. अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या मित्रासह त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून ते फरार झाले होते. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला होता. चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून तीनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत अशी माहिती पुढे आली होती.
कोयता गँगची दहशत कायम...
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच, यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.























