Ajit Pawar : ... तर 16 आमदार निलंबित झाले असते: अजित पवार
नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे
Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून सगळ्या विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता विरोधीपत्र नेते अजित पवार यांनी नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील असं स्वप्न पाहू नये, अशी टीका केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित झाले असते, असंही ते म्हणाले.
ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही. नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करु शकत नाही. राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की जे मला त्यावेळेस जे योग्य वाटलं ते केलं. असा प्रसंग कोणावरही येऊ नये, आला तर आताच्या अनुभवावरून निर्णय द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वीच लातूरमध्ये सांगितलं होतं की हा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात येईल. मात्र या निकालाचे दूरगामी परिणाम होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पक्षांतर बंदी कायद्याता कितपत अर्थ उरेल किंवा अर्थ राहिल की नाही याची भीती वाटते. राज्यात अशा घटना घडल्या की राजकीय स्थिरतेवर परिणाम होतो. लोकांच्या जनमताचा अपमान होतो.
ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्यपाल म्हणाले की मला त्यावेळी जे पटलं ते मी केलं. त्यावेळच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणाला न सांगता राजीनामा दिला. तो द्यायला नको होता. राजीनामा दिल्यावर कळलं की राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेलं हे पद महाविकास आघाडीकडून तातडीने भरलं गेलं नाही. ते भरलं गेलं असतं तर 16 आमदार अपात्र ठरले असते. मी याबाबत कोणाला दोष देत नाही पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवं होतं, असंही त्यांनी स्पष्ट
केलं आहे.
महाविकास आघाडीच्या सभा जूननंतर
खारघरमध्ये महाराष्ट्रभूषण कार्यक्रमात उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचे झटके आले. त्यात अनेक लोक दगावले. उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सभा जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.