Pune News: पुणेकरांना रस्त्यावर गाडी थांबवून शॉपिंग करणे पडणार महागात
Pune News: पुणेकरांना आता रस्त्यावर गाडी लावून खरेदी किंवा खाद्यंती करणे महागात पडणार आहे. महापालिकेकडून अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
Pune News: पुणे (Pune) शहरात अनेक ठिकाणी खाऊगल्ली आहे आणि रस्त्याच्या कडेला विविध स्टॉल्स देखील आहेत. याच स्टॉल्सवर खाद्यंती करणे किंवा खरेदी करणे आता पुणेकरांना चांगलच महगात पडणार आहे. या सगळ्या स्टॉल्स समोर गाडी उभी करुन खरेदी केल्यास आता पुणे महापालिकेकडून दंड आकारण्यात येणार आहे. दुकाकी किंवा चारचारी दोन्ही गाड्यांवर दंड आकारण्यात येणार आहे.त्यामुळे आता पुणेकरांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
कशी असेल कारवाई?
पुण्यातील विविध रस्त्यांवर अशा प्रकारच्या गाड्या उभ्या दिसतात. त्यात अनेकदा वेगवेगळी कारणे देत पुणेकर खाद्यंती किंवा खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडचणी येतात. त्यामुळे पालिकेकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच या प्रकारची कारवाई होत असल्याने पुणेकरांना ही कारवाई चांगलीच महागात पडू शकते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून आयुक्त कार्यालयाची मंजूरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. वाहतूक कोंडी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हा नियम लावण्यात येणार आहे.
किती रुपये दंड असेल?
भाजी, खरेदी किंवा खाण्यासाठी गाडी दुकानासमोर उभी केल्यास 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुण्यातील मुख्य रस्त्यांवर सुरुवातीला या प्रकारची कारवाई करणार आहे, असा निर्णय अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून घेण्यात आला आहे.
अतिक्रमण कारवाईला वेग
पुण्यात पालिका प्रशासन राज सुरु झाल्यापासून पालिकेकडून पहिलं काम अतिक्रमण कारवाईचं करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातील विविध परिसरातील दुकाने, हॉटेल्स यांच्यावर जबर कारवाई करण्यात आली होती. पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली होती. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेकसुद्धा केली होती.