(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Shivsena News : मंचरमध्ये शिवसेनेच्या मशाल यात्रेत फ्री स्टाईल हाणामारी; पदाधिकारीच भिडले, व्हिडीओ व्हायरल
शिवसेनेच्या मशाल यात्रेत फ्री स्टाइल हाणामारी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमधील मशाल यात्रेदरम्यान ही घटना घडली. ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्यात ही हाणामारी झाली आहे.
Pune Shivsena News : शिवसेनेच्या (Shivsena) मशाल यात्रेत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील मंचरमधील मशाल यात्रेदरम्यान ही घटना घडली. ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्यात ही हाणामारी झाली आहे. राजाराम बाणखेले आणि दत्ता गांजाळे अशी दोघांची नावे आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
शिवजन्मभूमी जुन्नर येथून निघालेली मशाल यात्रा मंचरमध्ये पोहोचली. या मशाल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मंचरचे शिवसैनिक दाखल झाले. त्यावेळी जिल्हा संघटक राजाराम बाणखेले आणि माजी सरपंच दत्ता गांजाळे एकमेकांसमोर आले. त्या दरम्यान हा प्रकार घडला. गांजाळे शिंदे गटाचे आहेत, शिवाय ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न करत आहेत. ही कोणती निष्ठा?, तुम्ही इतर पक्षात हिंडता?, असं म्हणत बाणखेले यांनी गांजाळेवर शाब्दिक प्रहार केला. जी व्यक्ती पाच पक्ष फिरुन आली ती मला काय निष्ठा शिकवणार, अशी प्रतिक्रिया गांजाळेनी दिली. यावरुन वादाला तोंड फुटलं आणि हे दोघे एकमेकांत भिडले. शिवसैनिकांनी मध्यस्थी करत या वादावर जागीच पडदा टाकला. पुढे मशाल यात्रा सुरुच राहिली. ती रात्री उशिरा मातोश्रीवर पोहोचली.
500 मशाली घेत कार्यकर्ते मातोश्रीवर
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते मातोश्री मशाल क्रांतीज्योतीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी मशाल प्रज्वलित करुन शिवतिर्थाकडे रवाना झाले. यावेळी सुमारे 500 मशाली हाती घेत जुन्नर आंबेगाव तालुक्यातून कार्यकर्ते निघाले होते.
एकीकडे मशाल तर दुसरीकडे तलवार-ढाल
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची? यावरुन मागील काही महिन्यापासून वाद सुरु आहे. याच वादामुळे शिवसेनेचं तत्पुरत्या स्वरुपात चिन्ह गोठवण्यात आलं. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली. शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना अशी नावं निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. त्यानंतर शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आलं आणि शिंदे गटाला तलवार-ढाल चिन्ह देण्यात आलं. या चिन्हांवरुन दोन दिवस दोन्ही गट एकमेकांवर फटकेबाजी करत आहेत. त्यातच शिवसेनेकडून अनेक शहरांमध्ये मशाल पेटवून आनंद साजरा केला जात आहे. यातच कार्यकर्त्यांचा हाणामारीचा व्हिडीओ समोर आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :