(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune | डीएसकेंच्या पुतणी सई वांजपे यांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने केली जामिनावर सुटका
सई वांजपे इतर मुख्य आरोपींसह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेली दोन वर्षे जेलमध्येच होत्या. त्यांची मुंबई उच्च न्यायालयाकडून अटी शर्तीसह एक लाखाच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
मुंबई: डी. एस. कुलकर्णी यांची पुतणी आणि या प्रकरणात सहआरोपी असलेल्या सई वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. एक लाखांच्या वैयक्तिक जामीनावर विविध अटीशर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके हे सध्या तुरुंगात आहेत.
फुरसुंगी येथील शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमीनी कमी भावात विकत घेत त्या जमीनी डीएसके यांच्या कंपनीला जास्त भावात विकून त्यात नफा कमवण्याच्या आरोप सई वांजपे यांच्यावर आहे. याप्रकरणी तपासयंत्रणेनं त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर सई यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.
तुरुंगात असल्याने डीएसके मुलीच्या अंत्यविधीलाही येऊ शकले नाहीत
सई वांजपे यांच्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून सदर जागेचे सर्व व्यवहार हे याप्रकरणातील मुख्य आरोपी बघत होते. त्याजागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही व्यवहारावर अथवा धनादेशावर सई वांजपे यांची सही नाही. यासंदर्भात तपास यंत्रणेकडे पुरेसा पुरावाही उपलब्ध नाही. तसेच सई यांना एक लहान मुलगा आहे आणि याशिवाय त्या गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे आता त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांच्यावतीनं कोर्टाकडे केली गेली होती. त्यांची ही बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने त्यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर सई यंना जामीन मंजूर केला.
तसेच याचिकाकर्त्यांनी तपास यंत्रणा पुढील तपासात पूर्ण सहकार्य करावे, पुराव्यांशी छेडछाड करु नये किंवा कोणत्याही साक्षीदारांशी कुठल्याशी प्रकारे संपर्क साधू नये, अथवा त्यांच्यावर दबाव आणू नये, तसेच न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात अनावश्यक कारणांसाठी स्थगितीची मागणी करु अशा अटीशर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे.