(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Ramod : लाचखोर अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन
लाचखोर आय ए एस अधिकारी अनिल रामोड यांच्या संदर्भात मोठी बातमी हाती येत आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून रामोडला निलंबित करण्यात आलं आहे.
Anil Ramod : लाचखोर आय ए एस अधाकारी अनिल रामोड यांच्या संदर्भात मोठी बातमी हाती येत आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून रामोडला निलंबित करण्यात आले आहे. सीबीआयने तशी मागणी केली होती. त्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबनाच्या अहवालात, रामोड यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन असेल, असे आदेशात म्हटले आहे. सध्या त्यांचा मुक्काम येरवडा जेलमध्ये आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने 9 जून रोजी रंगेहात पकडलेले पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल गणपतराव रामोड यांचा जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने फेटाळला होता. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग विकासासाठी घेतल्या जात आहेत, त्यांना जास्त मोबदला देण्याच्या बदल्यात 8 लाख रुपयांची लाच घेताना रामोड यांना पकडण्यात आले होते.
घरात मोठी संपत्ती सापडली...
रामोड यांच्या झडतीदरम्यान त्याच्या बाणेरमधील घरातून 6.64 कोटी रुपये तसेच महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त रामोडच्या पत्नीच्या नावाने नोंदणीकृत M/S वेदलक्ष्मी डेव्हलपर्स डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बाणेर कार्यालयाची सीबीआयने झडती घेतली, त्याठिकाणी देखील काही कागदपत्रे सापडली. याशिवाय रामोड आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या 17 बँक खात्यांमध्ये सीबीआयला 47 लाख रुपये सापडले.
जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच
दरम्यान 10 जून 2023 अनिल रामोडला सीबीआयकडून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अनिल रामोडकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची लाच मागत असे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोडने 10 लाख रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर रामोडचे पुण्यातील शासकीय निवासस्थान, बाणेर भागातील रुतुपर्ण सोसायटीतील फ्लॅट आणि नांदेड इथल्या घरी सीबीआयकडून दिवसभर छापेमारी करण्यात आली. यामध्ये रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत.