पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनानं निधन
टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झालं असून ते 42 वर्षांचे होते. ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं.
पुणे : टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही9 मराठीसोबत होते, त्याआधी त्यांनी बराच काळ एबीपी माझामध्ये देखील काम केलं होतं.
माहितीनुसार पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरु झाला होता. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरु केले. 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली, जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र तिथेही त्रास सुरु होता, त्यामुळे त्यांची कोपरगावमधे अँटिजेन टेस्ट करण्यात आली, जी पॉझिटिव्ह आली.
अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही
त्यानंतर रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना अॅम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जम्बो हॉस्पिटलमधे भरती केलं होतं. जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले. मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जम्बो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक अॅम्ब्युलन्सची गरज होती. अशी अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरु होते . मंगळवारी रात्री एक अॅम्ब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहोचली, पण त्यामधील व्हेंटिलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं.
त्यानंतर दुसरी अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा-सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला अॅम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला, पण तोपर्यंत पांडुरंग यांची प्रकृती आणखी खालावली होती.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अॅम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत, असा फोन आला. पांडुरंग यांचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहोचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिॲक अॅम्ब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहोचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.