(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident News : मोबाईल वापरत गाडी चालवणं दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं; हसरी खेळती मुलं गेल्यानं खांडेकर कुटुंबीयांवर शोककळा
बारामती येथे भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या मुलांना चिरडल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला.
बारामती, पुणे : मोबाईल वापरत गाडी चालवणं (Accident) हे दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं आहे. बारामतीमधील चोरमंडलम फायनान्समधे मॅनेजर पदावर असलेला धायगुडे नावाचा व्यक्ती मोबाईल पहात कार चालवत होता. मोबाईलच्या नादात त्याने शाळेत चाललेल्या तीन मुलांना उडवलं. त्यात दोन सख्खे भाऊ होते तर एक त्यांचा चुलतभाऊ होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर आहे. त्यामुळे आजच्या युगात मोबाईल वापरणे हे महत्त्वाचे असले तरी कधी मोबाईल वापरावा याची जाण असणं महत्वाचं आहे.
मोबाईल वापरत गाडी चालवल्याने बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथील खांडेकर कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संतोष खांडेकर आणि ताई खांडेकर यांच्या डोळ्यातले पाणी कमी होत नाही. खांडेकर यांची दोन मुले आणि त्यांचा पुतण्या शाळेत जात असताना या तिघांना चारचाकीने धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक दवाखान्यात उपचार घेत आहे. दोन्ही मुलांच्या अचानक जाण्याने खांडेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ओमकार (16 वर्ष), रुपेश (15 वर्ष) आणि संस्कार खांडेकर (13 वर्ष) हे तिघे भाऊ जळगाव सुपे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कुल शाळेत निघाले असताना ही घटना घडली. यात रुपेश आणि ओमकार यांचा जागीच मृत्यू झाला आणि याच घटनेने खांडेकर कुटुंबीयांचा आनंद हिरावून घेतला आहे. खांडेकर हे मोलमजुरी करून पोट भारतात. गंभीर जखमी असलेल्या मुलावर उपचार करण्यारखी त्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी सरकारने मदत करावी अशी मागणी खांडेकर यांचे नातेवाईक करत आहेत.
आपल्या आजुबाजुला शिकले- सवरलेले अनेकजण मोबाईलचा वापर करत गाडी चालवताना आपण बघत असतो. कारण मोबाईल विकत घेण्याची ऐपत असली तरी तो कसा वापरायचा याची जाण वापरणाऱ्याला असतेच असं नाही. एका फायनान्स कंपनीत मॅनेजर पदावर असलेल्या व्यक्तीलाही ती नव्हती आणि त्यामुळे आख्खं खांडेकर कुटुंब उद्वस्थ झालं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी गाडी चालवताना मोबाईल वापर टाळायला हवा.
मोबाईलचा वापर अन् तरुणाई
सध्या सगळीकडेच मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलच्या वापराचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. मोबाईल बघत किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये, असं लिहिलं असतं मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन तरुण मुलं अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतात. आज दोघांचा या मोबाईल वापरामुळे जीव गेला आहे. मात्र हे थांबलं नाही तर याची संख्या वाढायला वेळ लागणार नाही.